नांदेड| जिल्ह्यात, शहरात, गुरुद्वारा परिसर व श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळाच्या परिसरात 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 4 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी अतिमहत्वाच्या व्यक्ती हे नांदेड जिल्हा येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टिने जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे.
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन
सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे.
या दिवशी महसूल, गृह, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली आहे.