श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l माहूर तालुक्यात ऍग्रीस्टॅक या संकल्पनेची अंमलबजावणी करावयाची आहे.या संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांचा माहिती संच निर्माण करण्यासाठी माहूर तालुक्यात ८ मार्च ते १३ मार्च २०२५ या कालावधीत ग्राम स्तरावर नोंदणी सप्ताह मोहीम स्वरुपात राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या सप्ताहचे औचित्य साधून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या नावाची नोंद करावी,असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.


नोंदणी सप्ताहात संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी व कृषी सहायक यांनी विवरणपत्रात नमुद दिनांकास स.८ वा. गावात उपस्थित राहून शिबिराचे आयोजन करावे. या शिबिर प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रभावशाली व्यक्ती, रास्तभाव दुकानदार, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, पोलिस पाटील, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी इत्यादीसह गावातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित करावे जेणेकरुन योजनेची माहिती अधिकाधिक शेतक-यांना होईल. मोहिम कालावधीत शेतकरी यांना घरोघरी भेट देऊन त्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करणे व गावातील जास्तीत जास्त शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यावर भर द्यावा.

या अनुषंगाने सी.एस.सी केंद्र चालकांच्या सहकार्याने गावपातळीवर शिविरामध्ये जास्तीत जास्त शेतकरी नोंदणी करण्यात यावी.सदर आदेशास तात्काळ अंमल द्यावा व मोहिम कालावधीत करण्यात आलेल्या नोंदणीचा अहवाल व जीपीएस फोटोग्राफ्स तहसिल कार्यालयात शिबिर पुर्ण झालेनंतर तात्काळ सादर करावेत.

मोहिम कालावधीत आयोजित शिबिरास जिल्हास्तरावरील वरीष्ठ अधिकारी तसेच नोडल अधिकारी भेटी देणार असुन सर्व नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी पूर्ण वेळ शिबिरास उपस्थित राहून जास्तीत जास्त शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी तयार करुन घेण्याची कार्यवाही करणार असल्याने माहूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सप्ताह मध्ये आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
