मुबंई| तूर खरेदी साठी शासनाने दर निश्चित केला असून यापेक्षा कमी दरात तूर खरेदी करणा-यांवर कारवाई केल्या जाईल, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही,असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यातील तूर बाजारभावाने खरेदी करण्याबाबत सदस्य राजेश राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.सत्तार बोलत होते. हंगाम २०२३-२४ मधील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात नाफेडच्या वतीने पणन महासंघामार्फत तूर खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली. १५३ तूर खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली असून ३ हजार ९४ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मात्र या ठिकाणी केवळ ४६ शेतकऱ्यांनी ५५० क्विंटल माल विक्री केला आहे. तूरीचे बाजारभाव आधाराभूत भावापेक्षा जास्त असल्यामुळे तूर खरेदी झालेली नाही.
त्याचप्रमाणे केंद्र शासनाने राज्यात पी.एस.एफ योजनेतंर्गत आधारभूत भावाने तूर खरेदी करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार तूर खरेदी करण्यात येत आहे,मात्र या खरेदीस शेतकऱ्यांमार्फत प्रतिसाद मिळत नाही. मात्र मार्केट कमिटीमध्ये आलेल्या सर्वांची तूर खरेदी केली जाणार आहे, आज ही खरेदी केंद्रे सुरु आहेत. तसेच तूरीचा फेरा कमी होऊ नये यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. बाजाराभाव आणि हमी भाव यातील तफावत यातील मध्यबिंदू काढून त्या किमतीला तूर खरेदी करण्याचा विचार केला जाईल, असे कृषीमंत्री यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य डॉ.वजाहत मिर्झा, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.