नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे सोमवार दि. १५ जुलै रोजी स. ११:०० वा. विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १४ जुलै रोजी डॉ. शंकरराव चव्हाण यांची १०४ वी जयंती आहे. यानिमित्ताने सोमवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात विशेष व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानास ज्येष्ठ साहित्यिक व ‘आधुनिक भगीरथ: ना. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव ग्रंथ’ या ग्रंथाचे संपादक डॉ. सुरेश सावंत हे ‘ना. डॉ. शंकररावजी चव्हाण: व्यक्तित्व, नेतृत्व आणि कर्तृत्व’ या विषयावर संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे राहणार आहेत तर व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांची या व्याख्यानासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या विशेष व्याख्यानाचा लाभ साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ. योगिनी सातारकर यांनी केले आहे.