नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी लातूर विभागातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.
राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वाढत्या वयानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा, व आजार यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ. सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ आबाधित ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत “मुख्यमंत्री वयोश्री” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये डीबीटी प्रणाली द्वारे निधी वितरीत करण्यात येणार आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी लातूर विभागातील लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील समाज कल्याण, विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयांशी संपर्क साधण्याचे अवाहन लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पेन्शन अदालत
नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै 2024 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवार 9 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.