नांदेड| २०२३ -२४ मध्ये नांदेड शहरात मुसळधार पाऊस पडल्याने अतिवृष्टी निर्माण झाली होती. नुकसान ग्रसतांना सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून माकप, सीटू, जमसं च्या वतीने मागील दीड वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा व तहसील नांदेड समोर विविध आंदोलने सुरु आहेत.


२०२३ मध्ये ९ कोटी व २०२४ मध्ये १८ कोटी रुपये नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर झाले आहेत. शासन निर्णया प्रमाणे मनपा व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळ पंचनामा करून जीपीस कॅमेरा द्वारे फोटोसह पूरग्रस्तांची यादी करावी असा आदेश आहे.

परंतु शासनाच्या आदेशाचे पूर्णतः उल्लंघन करून उपरोक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी जवळच्या नातेवाईक तसेच दलाला मार्फत नावे मागवून पूरग्रस्तांची यादी करून १८ कोटी रुपये हडप करण्याचा कट रचला आहे. दि. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा संकेत स्थळावर पूरग्रस्तांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्या यादीवर अनेक पक्ष संघटणांनी आक्षेप घेतला आहे.

नूतन जिल्हाधिकारी यांनी आक्षेप घेण्याची सूचना केल्यामुळे जुजबी कार्यवाही तहसील मार्फत करण्यात आली असून ज्यांनी पूर्ण अर्ज भरून आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले नाहीत. ती बोगस यादी रद्द करावी व ज्यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी म्हणून आज घडीला देखील जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण सुरु आहे.

शासनाचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनाच्या प्रति राष्ट्रपती,राज्यपाल,मुख्य सचिव, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, आमदार खासदारांना पाठविल्या आहेत. अशी माहिती कॉ. गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.