नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीतील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) क्रीडा स्पर्धेमध्ये ग्वालियर येथील लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन विद्यापीठ प्रथम विजयी ठरले. साखळी सामन्यामध्ये पुणे येथील भारती विद्यापीठाचा ३-० असा पराभव करून ग्वालियर विद्यापीठाने प्रथम येण्याचा मान मिळविला. तर उपविजेतेपद पुणे येथील भारती विद्यापीठाला मिळाले.
बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी अंतिम सामने झाल्यावर विद्यापीठ परिसरातील इनडोअर हॉलमध्ये बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. विद्यापीठाचे कुलसचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी.डी. पवार यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर ज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू तथा सी.ए. प्रवीण पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू विनोद नेम्मानिवार, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू सय्यद निसार, व्यवस्थापन परिषद सदस्य इंजि. नारायण चौधरी, डॉ. सिंकू कुमार सिंह, अंकुश पाटील, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, राजकुमार दहीहंडे, मन्मतअप्पा पाळणे, इंदरबीरसिंग, वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, पी.एस. पंत, डॉ. विक्रम कुंटूरवार, डॉ. महेश बेंबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठामध्ये दि. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राज्यस्थान व मध्य प्रदेश इत्यादी राज्यातील विद्यापीठ स्तरावरील ११४ व्हॉलीबॉल संघ सहभागी झाले होते. या साखळी स्पर्धेद्वारे चार संघ अंतिम सामन्यांमध्ये पोहोचले होते. यामध्ये ग्वालियर येथील लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन विद्यापीठ, पुणे येथील भारती विद्यापीठ, हनुमानगढ (राजस्थान) येथील श्री. खुशालदास विद्यापीठ आणि नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे चार विद्यापीठ होते.
यामध्ये ग्वालियर येथील विद्यापीठाने पुणे येथील भारती विद्यापीठाचा ३-० असा पराभव करून प्रथम विजेतेपद पटकावले. दुसऱ्या स्थानावर पुणे येथील भारती विद्यापीठ उपविजेते ठरले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी हनुमानगढ आणि नागपूर विद्यापीठामध्ये सामना झाला. यामध्ये हनुमानगढ येथील श्री. खुशालदास विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाचा ३-० असा पराभव केला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर हनुमानगढ येथील श्री. खुशालदास विद्यापीठ हे विजेते ठरले.
चौथ्या क्रमांकावर नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ पात्र ठरले. या चारही टीम नॅशनल विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. राष्ट्रीय विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये चारही विभागातून ४-४ अशा १६ टीम मधून स्पर्धा होतात. त्यामधून पुढे राष्ट्रीय विद्यापीठ टीमची निवड होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यापीठातर्फे अनेक समित्यांचे गठन करण्यात आले होते. त्या सर्व समित्यांनी आपआपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांनी आभार मानले.