श्रीक्षेत्र माहूर,राज ठाकूर। माहूर ते किनवट राष्ट्रीय मार्गावर माहूरपासून केवळ ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवळणी फाट्याजवळील शेतकरी तुळशीराम राठोड यांच्या शेतात दि.५ जून रोजी जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा अवलंब करत या गंभीर घटनेतील आरोपींचे फोटो प्रकाशित करुन त्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यास पोलिस अधीक्षकांकडून ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
माहूर-किनवट मुख्य महामार्गावरील माहूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नखेगाव ते हिवळणी फाट्याजवळ एका शेतात दिड महिन्यापूर्वी अंदाजे २० ते २५ वर्षाच्या महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मुत्तदेह आढळला होता. सदर महिलेची ओळख पटलेली नाही. त्यामुळे तिचे मारेकरी नेमके कोण हे पोलिसांना काही केल्या समजत नव्हते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस पथकांमार्फत आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक तपासात पोलिसांना यश आले. दुचाकीवर असणाऱ्या खुनी आरोपीचा शोध घेण्यासाठी माहूर पोलिसांनी शोधपात्रिका प्रसिद्ध केली आहे. आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलीस दलाकडून ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे अशी माहिती सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी दिली.