नांदेड। सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक तथा कादंबरीकार डॉ. राम वाघमारे यांची निवड करण्यात आली असून येत्या 30 डिसेंबर रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य मंडळाचे कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.


सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षी एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी कंधार तालुक्यातील गोणार येथे ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न झाले होते. मंडळाच्या कार्यकारी बैठकीत सन 2022 च्या दुसऱ्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक तथा समीक्षक डॉ. राम वाघमारे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे.


डॉ. राम वाघमारे यांचे डोन्ट वरी सर (कथासंग्रह) खेळ, ग्रॅपल, लढा, गुरुजींची शाळा, फाईट फॉर द राईट, इ. कादंबऱ्या व दीपस्तंभ ऊर्जास्त्रोत, आक्का; कोहिनूर ए गझल इलाही इ. चरित्रात्मक पुस्तके आणि काकांच्या शैक्षणिक गप्पा (शैक्षणिक ) जखमांचे सुगंधी पण जपणारा इलाही (संपादित) समकालीन कादंबरीकार भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे (समीक्षाग्रंथ) इ. साहित्य संपदा प्रकाशित असून त्यांनी काळया व 98% या शैक्षणिक लघु चित्रपटाची निर्मितीही केली आहे.

डॉ. राम वाघमारे हे श्री शारदाभवन संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. बबन जोगदंड, डॉ. विलास ढवळे, दत्ताहरी धोत्रे, नंदकुमार बनसोडे, शुध्दोधन गायकवाड, मिलिंद चावरे, संजय नरवाडे, बाबुराव कसबे, रवी लोहाळे, मिलिंद व्यवहारे, प्रा. डॉ. राजेंद्र लोणे यांनी राम वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे.
