नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी ; प्रतिस्पर्धी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा झाला पराभव -NNL

0

नांदेड| १६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी झाले आहेत.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना एकूण ५ लक्ष २८ हजार८९४ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्याने नांदेड लोकसभेची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, निवडणुकीत मतदारांनी भाजपला नाकारत काँग्रेसला विजयी केले आहे.

कधीकाळी अशोक चव्हाण आणि विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे कट्टर विरोधक होते. मात्र, चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने फायदा होण्याऐवजी, नांदेडची जागा भाजप पक्षाला गमवावी लागली. नांदेडकरांची सहानुभूती अशोक चव्हाणांना नव्हे, तर काँग्रेसला असल्याचे या निकालात स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या फेरीपासून आघाडीवर राहत वसंतराव चव्हाण यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना २७ व्या फेरीनंतर त्यांना विजयी घोषित करुन प्रमाणपत्र बहाल केले.

तत्पूर्वी सकाळी ७.३० च्या सुमारास निवडणूक निरीक्षक शंशाक मिश्र आणि समीरकुमार ओ. जे. व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विविध पक्षाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम उघडण्याची कार्यवाही केली. ८ वाजता स्ट्राँगरुम उघडून मतमोजणीला सुरुवात केली. सर्वप्रथम पोस्टल मत मोजणीला सुरुवात झाली. या सुमारास ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीला ही सुरुवात झाली. शासकीय तंत्रनिकेतनच्या तळमजल्यावर तीन विधानसभा मतदारसंघ तर पहिल्या माळ्यावर तीन मतदार संघ अशा पद्धतीने सहा विधानसभा क्षेत्रात ही मतमोजणी पार पडली.

सकाळी साडेदहाच्या सुमारास पहिला फेरीचा निकाल आला.पहिल्या मतमोजणी फेरीत भाजपाचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी १९ हजार ५४३ मते घेऊन १ हजार 386 मतांची आघाडी घेऊन पुढे होते. तर दुसऱ्या फेरीपासून काँग्रेसचे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आघाडीवर कायम ठेवत शेवटच्या फेरीला ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले.

सकाळी आठ वाजता पासून सुरू झालेल्या मतमोजणीला रात्री वाजता २७ व्या फेरीच्या नंतर विराम मिळाला. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात. मतमोजणीसाठी विविध विभागाचे पाचशे कर्मचारी तर पोलीस विभागाचे 500 कर्मचारी असे जवळपास 1000 कर्मचारी मतमोजणीच्या कार्यात कार्यरत होते.

5315 टपाली मते
या निवडणुकीमध्ये 5315 टपाली मते मोजण्यात आली. यामध्ये निवडणुकीसाठी कार्यरत असणारे कर्मचारी, सैन्य दलात असणारे कर्मचारी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. आज झालेल्या मतमोजणी मध्ये विजयी उमेदवार वसंतराव चव्हाण यांना 2029 तर भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना २ हजार तर लढतीत तिसऱ्या क्रमांकावर न आलेले वंचित बहुजन आघाडीचे भोसीकर यांना 422 टपाली मते मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here