नवीन नांदेड l शेअर म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे काय? त्याचबरोबर त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन शेअर मार्केट विषयातील तज्ञ प्रा.राहुल खेडकर यांनी केले.
वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात शेअर मार्केट गुंतवणूक या विषयावर विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शेअर मार्केट अभ्यासक प्रा.राहुल खेडकर मार्गदर्शक म्हणून बोलत होते.प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.
वसंतराव नाईक महाविद्यालय तर्फे विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कृतिशील प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉ.पी.बी.बिरादार, डॉ. जी वेणुगोपाल,यांची उपस्थिती होती.
उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, शेअर मार्केट म्हणजे काय असतं, शेअर मार्केट मधून आपल्याला नफा कसा मिळवता येतो. शेअर मार्केटच्या माध्यमातून कोण कोणते फायदे होतात आणि शेअर मार्केट आपल्या जीवनात किती महत्त्वाचा भाग आहे, या संबंधी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन त्यांनी केले. व्यक्तिमत्व विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करताना दैनंदिन ताणतणाव कसा कमी करता येतो यावर अनेक प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना अनेक विषयात करिअर करताना रोजगाराच्या संधी कुठे कुठे आहेत व त्या कशा प्रकारे मिळवता येतात व विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी व्यवसायाकडे अधिक प्रमाणात वळावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कपिल हिंगोले यांनी केले तर आभार प्रा.शशिकांत हाटकर यांनी मानले. सदरील कार्यक्रमाला महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.