अंगारिका चतुर्थी निमित्ताने वाढोण्याच्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी -NNL

0

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहराजवळील पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. येथील मंदिरात भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात चतुर्थीला विशेष गर्दी असते. यंदाच्या नूतन वर्षातील हि पहिली अंगारिका चतुर्थी असल्याने आज सकाळपासून महिला मंडळींनी गर्दी केली होती अशी माहिती पुरोहित परमेश्वर बडवे यांनी दिली. मृग नक्षत्र प्रारंभ होऊन १५ दिवस झाले मात्र म्हणावा तास पाऊस झाला नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील भाविक भक्तांनी पाऊस पाणी चांगले पडू दे…. आणि बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे…. असे म्हणत पावसासाठी साकडे घातले आहे.

मंदिराची निमित्ती होऊन अनेक वर्ष लोटली मात्र भाव मंदिरावर कळस बसविण्याचा मुहूर्त लागला नव्हता. या मंदिराच्या कळस रोहणाचा मुहूर्त बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगावकर आणि संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दि.२५ एप्रिल रोजी साधल्या गेला आहे. तत्पूर्वी दि.२४ रोजी गावातील मुख्य रस्त्याने भव्य कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तानी उपस्थित होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाढोणा वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.

वाढोणा शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर निसर्ग निर्मित्त पांडवकालीन युगातील कनकेश्वर तलाव आहे. सध्याच्या हिमायतनगर शहराचे नाव त्याकाळी वारणावती होते. पांडवानी या तलावाला ओमचा आकार दिला आणि द्रोपदीने तलावात शुभ्र कमळाचे फुलं लाऊन मंदिर परिसराला सजविल्याची अख्याईका जुने जाणकार सांगतात. याचं पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक गणपतीचे मंदिर चंद्राच्या बिंबावर वसलेले आहे. कालांतराने या ठिकाणी गौंड राज्याचे राज्य अस्तित्वात आले, त्या राजाने वारणावती शहराचे नाव बदलून वाढोणा ठेवले. राजे शामबहादूर यांनी वाढोणा शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला होता. ते याच ठिकाणी राहून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहत शेतसारा वसूल करत असे. कालांतराने निजामशाही राजवटी सुरु झाली. त्या काळात हिमायतअली नावाचा सरदार वाढोणा जिल्ह्याला भेट देण्यासाठी आला होता. सर्व जाती – धर्माच्या लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर खुश होऊन हिमायतअली राजाने हिंदू – मुस्लिम समाजासाठी शेतीच्या स्वरूपात भव्य नजराणा बहाल केला. सरदार च्या उपकाराची परतफेड म्हणून हिमायतअली नावाचे नामांतर करून वाढोणा शहराला हिमायतनगर नाव देण्यात आले. तेंव्हाच वारणावती/ वाढोणा आज हिमायतनगर नावाने ओळखले जाते आहे.

निजामाच्या राजवटीत या तलवानजीक असलेल्या शिवमंदिरासह अन्य मंदिराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्यापासून मूर्तीचे रक्षण करण्यासठी येथील काही लोकांनी वरद विनायकाची मूर्ती लिंबाच्या झाडा खालील कंबरे इतक्या खोल खड्यात जपून ठेवली होती. तीच वरद विनायकाची मूर्ती तब्बल दीडशे वर्षानंतर याच अवस्थेत उन, वारा, पावसाचा अनुभव घेत राहिली. सण १९७८ ला तत्कालीन अवतारी पुरुष श्री संत पाचलेगावकर महाराज यांनी हिमायतनगर शहराला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कनकेश्वर तलावासह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यावेळी गावातील गणेशभक्त व परिसरातील शेतकर्यांनी श्रमदान केले. संकल्प पूर्ण करण्यासाठी २५ वर्षानंतर नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती श्री प्रताप देशमुख सरसमकर यांच्या सहकार्याने गुरुवर्य लाखने महाराज, कांतागुरु आजेगावकर, यांच्या पुढाकारातून मंदिर बांधकामाची सुरुवात करण्यात आली होती.

यासाठी हिमायतनगर शहरातील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव काळात केला जाणारा अनधिकृत खर्च टाळून उर्वरित रक्कम, लोकवर्गणी व मजुरीचे पैसे वाचवत वरद विनायकाचे मंदिर उभे केले. उंच टेकडीवरील मंदिरात अष्टभुजाधारी इच्छापूर्ती वरद विनायकाची विशाल मूर्ती मोठ्या कसोटीने नेण्यात येउन, विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. तेंव्हापासून हि वरद विनायक गणेशाची मूर्ती सर्वाना आशीर्वाद देत असून, गणेश उत्सव पर्व काळात या ठिकाणी गणेश मूर्तीची पूजा- अर्चना महाभिषेक, महाप्रसादाच्या पंगती केल्या जातात. वरद विनायकाच्या दर्शनाने अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिषेक पंगत करून आशीर्वाद घेतात असा अनुभव भक्त सांगतात. मागील काळात तर काही भक्तानी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मंदिर विश्वस्तांकडे सोन्याच्या गणपती भेट देऊन नवस पूर्ण केला होता हे सर्वश्रुत आहे.

येथील व्यापारी शांतीलाल श्रीश्रीमाळ व भास्कर चिंतावार आदींसह त्यांचे सहकारी आणि शहरातील गणेशभक्त देणगीदारांची सहकार्यातून शहरातून कलशाची भव्य मिरवणूक काढून दि.२५ एप्रिल २०२२ रोजी दोन्ही मंदिराचा कलशारोहन सोहळा बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगाव, संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज, दत्त संस्थान दिघी यांच्या प्रमुख उपस्थितीत होम-हवन, पूजाविधी आणि महाआरती होऊन संपन्न झाला.

हिमायतनगर येथील ओम आकराच्या कनकेश्वर तलावाच्या चंद्राच्या बिम्बावर नवसाला पावणाऱ्या इच्छापूर्ती श्री वरद विनायकाचे मंदिर आधुनिक स्वरूपात उभे आहे. यात विराजमान झालेली अष्ठभूजाधारी श्री वरद विनायकाची मूर्ती हि प्राचीन कालीन आहे. मंदिराचा गर्भगृह, समोरील प्रांगण, आणि गर्भग्रहा भोवति प्रदक्षिणापथ असे उंच टेकडीवरील मंदिराचे स्वरूप आहे. दर महिन्याची अंगारिका, गणेश, संकष्ठ चतुर्थी, श्रावण मास व गणेशोत्सवाच्या पर्व काळात विदर्भ – मराठवाड्यातील हजारो भाविक – भक्त दर्शनासाठी तोबा गर्दी करतात. यावर्षीच्या मंगळवारी आलेल्या पहिल्या अंगारिका चतुर्थी दिनी शहरासह विदर्भ- मराठवाड्या तील हजारो भाविक भक्तांनी श्री वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आणि पाऊस पाणी पडू दे…. बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे… असे म्हणत अनेक भाविकांनी पावसासाठी वरद विनायकाला साकडे घातले अशी माहिती पुरोहित परमेश्वर बडवे यांनी दिली.

येथील कनकेश्वर तलावात पावसाच्या जमा झालेले पाण्यात जिवंत पांढऱ्या कमळाचे अस्तित्व आहे, परंतु पावसा अभावी हे तलाव या वर्षी कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे निसर्गरम्य तलावातील दृश लोप पावल्याने गणेश दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांना मोहित करणारा मंदिर परिसराच्या नयनरम्य देखाव्य पासून वंचित राहावे लागतआहे. कायमरूपी निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने श्रीक्षेत्र दर्जा असलेल्या हिमायतनगर शहरातील वरद विनायक मंदिर व पांडवकालीन तलावाचा विकासाठी भरपूर निधी दिला असून, यातून विकास कामे सुरु आहेत. आणखी मंदिराचा विकास होऊन प्रकाशझोतात यावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत याना मंदिराच्या जुन्या व नवीन स्वरूपातील छायाचित्रे व तसा अहवाल पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here