‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार -NNL

0

मुंबई|‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. उद्यापासून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास सचिव डॉ. अनुप कुमार यादव उपस्थित होते. तर दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यात यावी.

लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा १ ते १५ जुलै या कालावधीत असणार आहे. यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. मात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावेत. तसेच, ज्या पात्र महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप उद्यापासून सुरू करण्यात येत असल्याचेही मंत्री कु.तटकरे यांनी यावेळी सांगितले.

सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. यासाठी गावपातळीवर विशेष शिबीरांचे आयोजन करणे आवश्यक असल्यास करावे. तसेच, जिल्हापातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here