नायगांव/नांदेड। मांजरम गावच्या पाणीपुरवठा योजना बोगस व निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते, त्या अनुषंगाने आज १० फेब्रुवारी रोजी मुखेड- नांदेड रस्त्यावर मांजरम येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर केले होते या आंदोलनाची दखल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ घेऊन घेतली.


कार्यकारी अभियंता एम.एस बोडके यांनी एका महिन्यामध्ये ही योजना चालू करण्यात येईल असे लेखी आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना लेखी दिलेल्या पत्रात सांगितलेले आहे. पांडूरंग शिंदे यांनी ज्या मागण्या केल्या त्यानुसार संतोष कन्स्ट्रक्शन व रोहित कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंत्राटदारावर दंड आकारण्यात आला आहे आणि पाणीपुरवठा सुरळीत चालु होणार नाही तोपर्यंत देयके रोखून धरण्यात आली आहेत असे लेखी सांगण्यात आले आहे.

या लेखी आश्वासनामुळे आंदोलनाच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आला आणि गावातील हनुमान मंदिर पासून ते मांजरम बस स्टॉप पर्यंत बँड वाजवत घोषणा देत चालत गेले,येथे रस्त्याच्या बाजूला आंदोलनाला सभेचे रूप देऊन उपस्थित गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी गावकऱ्यांच्या मनामध्ये कंत्राटदारावर आणि अधिकाराबद्दल प्रचंड रोष दिसत होता.

यावेळी पांडूरंग शिंदे,शिवाजी शिंदे, भास्कर गायकवाड, श्रीपत शिंदे,सरपंच प्रतिनिधी आशिष शिंदे, उपसरपंच बालाजी माली पाटील, हनुमंत शिंदे,राहुल शिंदे, चंद्रकलाबाई, नारायण माली पाटील, शिवाजी ताटे,विश्वनाथ शिंदे, जावेद शेख, अंतेश्वर फुगारे , आशिष वंजारे इ व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.

एक महिन्याच्या आत योजना पूर्ण करावी व खोदलेले रस्ते दुरूस्त करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा पांडुरंग शिंदे मांजरमकर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी दिला आहे.