हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यात एकतेचा संदेश देणाऱ्या हिमायतनगर शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली असून, त्या निमित्ताने येथील मुस्लिम समाज बांधवानी शहराबाहेरील इदगाह मैदानात सकाळी ९.३० वाजता सामुहिक नमाज अदा केली. यावेळी देशात शांतता नांदावी यंदाचा खरीप हंगाम चांगला येऊ दे…. आणि सर्वांच्या घरात सुख समृद्धी नांदावी अशी विनवणी (दुवा) करण्यात आली. त्यानंतर लहान थोरांनी एकमेकांना गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.


प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी मुस्लिम समाज बांधवाचा महत्वपूर्ण रमजान ईद उत्सव गेल्या महिन्याभराच्या उपवासानंतर दि.31 सोमवारी आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी इदगाह मैदानावर जमलेल्या समाज बांधवाना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या ईदच्या देशात शांतता नांदावी…. हिमायतनगर शहरातील भाईचाऱ्याची परंपरा कायम ठेऊन अल्लाहने दाखविलेल्या भक्ती मार्गावर चालण्याचा संदेश देण्यात आला. तसेच ईद – उल – फित्रची नमाज अदा करून यंदाचा खरीप हंगाम चांगला होऊन शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे.. सर्वांच्या घरात सुख समृद्धी नांदावी अशी दुवा करण्यात आली.


दरम्यान रमजान ईदच्या निमित्ताने श्री परमेश्वर मंदिर व गावातील हिंदू बांधवाच्या वतीने बाजार चौकात इदगाव मैदानावरून नमाज आदा करून परत येणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच चहा – फराळाचे आयोजन करून एकमेकांप्रती प्रेम भावना प्रगट करण्यात आली. तर मुस्लिम बांधवानी आमंत्रिताना शिरकुर्मा फराळ देवून ईदचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी शहरात यात्रेचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून आले. तर वडीलधाऱ्या माणसासह चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ईदच्या सणाचा उत्साह दिसून आला. यावेळी मंदिर कमिटीच्या सदस्यांसह शहरातील अनेक मान्यवर नागरिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
