हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरातील नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 11 मधील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वरून पावसाचे पाणी आणि नाल्या नसल्याने गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत असंल्याने याच पाण्यातून विद्यार्थिनींना शाळा कॉलेजकडे जावं लागते आहे. तसेच शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यातूनच येजा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन किमान पावसाळ्यापुरते तरी तात्पुरती रस्त्याची दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहराला नगरपंचायतीचा दर्जा मीळाल्यानंतर शहरातील रस्त्यासाठी कोट्यावधीच्या निधी उपलब्ध झाला होता. त्यातून सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यात आले असून, शहराच्या कायमस्वरूपी नळ योजनेच्या निर्मितीच्या नावाखाली नुकत्याच करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयाचे रस्ते मधोमध जेसीबीने खोदून काढण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळीत आणि शाळा कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उन्हाळ्यात धुळ आणि पावसाळ्यात चिखल अशी परिस्थिती हिमायतनगर शहराची झाली असून, नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा आणि पाणीपुरवठ्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची मनमानी यामुळे शासनाकडून तयार झालेल्या कोट्या रुपयाच्या निधीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याची वाट लागली आहे.
गेल्या आठ दिवसापासून हिमायतनगर शहर व परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिकडे तिकडे रस्त्यावर खोदून टाकलेल्या पाईपलाईनच्या नालीमुळे वाहनधारकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी देखील रस्त्यावर येत असल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थी व दर्शनासाठी ये जा करणाऱ्या महिला मंडळींना या दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच अडचणींचा सामना करत जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकातून व्यक्त केली जात आहे.
हिमायतनगर शहरातील हुतात्मा शाळा कॉलेजकडे जाणारा रस्ता, मुख्य बाजारपेठेतील पळसपुर चौक ते पोलीस ठाण्याचा पर्यंत जाणारा रस्ता, बजरंग चौक ते पोलीस स्थानक रस्ता, कालिका गल्ली ते सिरंजनी पॉईंट व पोलीस स्थानक रास्ता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोलीस ठाणे, बोरगडी रोड व पाण्याच्या टाकीकडे नेहरू नगरकडे जाणारा रस्ता, चौपाटी ते रहीम कॉलनी, मूर्तजा नगर, पोलीस ठाणे ते बाजार चौक चौपाटी रस्ता, छत्रपती शिवाजी चौक ते श्रीराम मंदिर, सराफा लाईन ते बजरंग चौक, चवरे गल्ली, लकडोबा चौक ते ढोणे गल्ली, आणि शहरातील विविध वॉर्डातील गल्ली बोळातील रस्ते देखील पाईपलाईनसाठी खोदकाम करून बुजविलेल्या नालीमुळे पाणी मुरून खड्डेमय व नाली तयार होऊन रस्ता चिखलमय झाला आहे. तसेच हिमायतनगर शहरातील उच्चशिक्षित कॉलनीतील रस्त्याची देखील हीच अवस्था झाली असून, अनेक रहिवाश्याना आपल्या आलिशान घराकडे जाताना चिखलातून पाय भरून जावे लागत आहे.
या रस्त्यावरून ये जा करताना नागरिकांची अक्षरशः घसरगुंडी होत असून, पाई जाणे तर सोडाच वाहन नेणे देखील अवघड बनले आहे. हिमायतनगर शहरातीळ रत्स्याची हि दुरावस्था नगरपंचायतचे मुख्याधिकारी व संबंधित प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने झाली असल्याचा आरोप वाहनधारक विद्यार्थी व शहरवासीय नागरिकांतून केला जात आहे. किमान पावसाळ्यामध्ये तरी रस्त्यावर नागरिकांची घसरगुंडी होणार नाही यासाठी नगरपंचायतीने नळयोजनेच्या पाईपलाईनसाठी केलेल्या रस्त्यावरील खड्ड्याच्या नाल्यामध्ये डस्ट टाकून तात्पुरता का..? होईना येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.
डासांची उत्पत्ती वाढली; विविध आजाराने नागरिकांना ग्रासले
रस्त्याच्या नाल्यामुळे शहारत ठीक ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले आहे. तसेच परिसरातील कचरा कुंड्यामुळे दुर्गंधी सुटली असून, नाल्यातून घाण पाणी जाण्यास वाट नसल्यामुळे गटाराचे पाणी देखील रस्त्यावर येत असल्याने वाहनासह पायी जाणारे विद्यार्थी नागरिक देखील घसरून पडून जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. शहरातील काही भागात तर मुख्य चौकाच्या ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने व तेथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून, खोकला ताप डायरिया यासह विविध आजाराने नागरिकांना ग्रासले आहे. हे आजाराचे प्रमाण वाढण्यापूर्वी नगरपंचायतीने शहरातील नागरिकांना किमान शहराच्या स्वच्छतेबरोबर तात्पुरती तरी रस्त्याची सुधारणा करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.