नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्हयातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भरारी पथकामार्फत अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम चालू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी हदगाव आणि नायगाव येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली. यावेळी अनुपस्थित असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे कॉपिमुक्त अभियान चालविले जात आहे. त्या अनुषंगाने दिनांक 13/02/2025 बारावीच्या मराठी पेपरच्या दिवशी जिल्हयातील सर्व वरिष्ठ अधिका-यांनी वेगवेगळ्या केंद्रांना अचानक भेटी दिल्या. सर्व परीक्षा केंद्रांवर सुरळीत परीक्षा पार पडली.

मराठीच्या पेपरला नांदेड जिल्हयातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भरारी पथकामार्फत अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्याच अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांनी आज दि.13/02/2025 रोजी पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हदगांव ता. हदगांव या परीक्षा केंद्रास भेट दिली असता बैठेपथक सदस्य श्रीमती सुरेखा तुकाराम बेले, ग्रामसेविका या अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे परीक्षा कामकाजात कसूर केल्याबद्दल त्यांना निलंबित केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांनी दि.12/02/2025 रोजीच्या हिंदी पेपरच्या दिवशी जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा ता. नायगांव येथील केंद्रावर शिवशेटटे राहूल, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती नायगांव खै. ता. नायगांव खै.यांना बैठे पथक प्रमुख म्हणून नियुक्ती दिलेली असताना देखील केंद्रावर पूर्णवेळ अनुपस्थित असल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे. बारावीच्या मराठी विषयासाठी 106 केंद्रावर 19992 पैकी 19307 परीक्षार्थीनी परीक्षा दिली. उपस्थितीचे प्रमाण 96.57% आहे.
