नांदेड| लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई आणि पुण्यात वसतिगृहासाठी शासन जागा देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या मंचावरून केली. खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही यात्रा मुंबईत दाखल झाली असून खा.गोपछडे यांनी केलेल्या सर्व मागण्यांची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. सन्मान यात्रेचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. समस्त लिंगायत समाजाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य हृद्य सत्कार करण्यात आला.
वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा खा. डॉ. अजितजी गोपछडे यांच्या नेतृत्वात दि. 5 सप्टेंबर रोजी भक्तीस्थळ, श्रीक्षेत्र राजुर (अहमदपूर) येथून आरंभ झाली. महाराष्ट्रातील अनेक शहरात या यात्रेचे भव्य स्वागत होत आहे. मुंबईत ही यात्रा दाखल झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मंचावरून उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी नवी मुंबई आणि पुण्यात जागा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत असा दाखला असणा-या सर्व जातींना इतर मागासवर्गीय (ओबीसी) दर्जा देण्यात यावा. ज्या पोटजातींना मागास प्रवर्गात आरक्षण आहे ते कायम ठेवावे.,जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळावर त्वरित अधिकारी व सदस्यांची नियुक्ती करून महामंडळ प्रभावीपणे कार्यान्वित करावे,केवळ मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांसाठीच हे महामंडळ न राहता,सर्वच वीरशैव लिंगायत प्राधान्याने आर्थिक दुर्बल समाज बांधवांना याचा सहज व त्वरित लाभ मिळेल अशी नियमावली नव्याने करून यातील जाचक अटी व पोर्टल वारंवार स्थागित होणे; अश्या तांत्रिक अडचणी त्वरित दुर करून त्याचा होतकरू युवक, महिला, विविध बचत गट यांना खरोखर लाभ होईल अशी रचना असावी.
सध्या दिलेल्या पन्नास कोटी रुपयांचा सदर महामंडळाचा निधी समाजाच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत तोकडा आहे. तो ’एक हजार कोटी’ रुपये एवढा उपलब्ध करावा, हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाच्या अनेक स्मशानभूमीवर विघातक शक्तींनी ठिकठिकाणी अतिक्रमण केली आहेत. ती त्वरित मोकळी करून द्यावीत,हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाच्या अनेक स्मशानभूमीच्या जागा /भूखंडांना शासकीय निधीतून त्वरित संरक्षक भिंती उभारून रक्षण करावे,हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाच्या जनसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी,महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात जगदज्योती महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रांची स्थापना करावी व त्यासाठी आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अकोला, यवतमाळ, संभाजीनगर, लातूर, नांदेड या शैक्षणिक शहरात विद्यार्थी वसतीगृहांसाठी जागा, इमारत, व आवश्यक सुविधासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा.
(आठरापगड जातीचा हा समाज असल्याने अनेकवंचित, आर्थिक मागास घटकांसाठी या शैक्षणिक – शिक्षण पूरक सुविधेची अत्यंत गरज आहे.), हिंदु वीरशैव लिंगायत समाजासाठी जनसंख्यानिहाय प्रत्येक जिल्हयात किमान एक ’वीरशैव सदन’ (सभागृह व पूरक सुविधा) यासाठी जागा व इमारत निधी उपलब्ध करून द्यावा,स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी अमान्य करून, संविधानानुसार हिंदु वीरशैव-लिंगायत समाजाला न्याय, सन्मान व प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध होईल अशी योजना करावी, आदी मागण्यांचा यात समावेश आहे. या मागण्यांची फडणवीस यांनी दखल घेतली असून सर्व मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास खा.डॉ.अजित गोपछडे यांनी व्यक्तकेला.
याप्रसंगी प. पू. वीरूपाक्ष शिवाचार्य पंचाक्षर शिवाचार्य महास्वामीजी,ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर,महादेव शिवाचार्य गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज,आ. सचिन कल्याणशेट्टी बसवराजजी पाटील मुरूमकर,डॉ. सौ. अर्चनाताई शै. पाटील चाकूरकर,डॉ. रविंद्र आरळी, श्रावण राजेंद्र जंगम, अण्णाराय बिरादार,हेमंत परशुराम हरहरे,नितीन शेटे,डॉ. राजेंद्र हिरेमठ, तेजस महाजन यांच्यासह गोविंदराव माखणे, गुरुनाथ मगे, प्रेरणाताई होनराव, अॅड. संभाजीराव पाटील, बसवराज पाटील कौळखेडकर, श्रीरंग महाराज औसेकर, कपिलदादा माखणे, बालाजी पाटील चाकूरकर, अमोल निडवदे, मेघराज भरबडे,उद्योजक माधव पाटील शिनगारे, गौरव ताकटे, यशवंत पाटील आदींची उपस्थिती होती.