नांदेड| विशेष सहाय योजनेतील अर्थात संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनातील जिल्ह्यामधील मंजूर 2 हजार 125 लाभार्थ्यांनी अद्यापही आपले बँक खाते आधारशी संलग्न करून घेतले नाही. अशा निराधार लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भातील अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे तातडीने बँकेशी आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने आवाहन केले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आदी योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना बँक किंवा पोस्ट खाते आधार क्रमांकाशी संलग्न अर्थात जोडल्या गेल्यानंतरच अर्थसहाय्याचे वाटप केले जाते. हा शासन निर्णय आहे.
जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी 2 हजार 125 लाभार्थी नव्याने पात्र ठरले असून या नव्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार खात्याशी संलग्न केले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समाजसेवकांना, नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की अशा लाभार्थ्यांची मदत करावी. त्यांना सेतू केंद्र व बँक येथे पोहोचवून त्यांचे खाते आधार कार्डशी जोडून घ्यावे, यासंदर्भातील अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तातडीने ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे तहसिलदारांनी केले आहे.