नांदेड शहराच्या विकासात येथील शीख समाजाचा मोठा वाटा आहे. येथील सुप्रसिद्ध धार्मिकस्थल गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब मुळे नांदेडची कीर्ति समस्त जगतात आहे. नांदेडचा शीख समाज धार्मिक आस्थावान आणि परंपरेला समर्पित असा समाज आहे. येथील शीख समाजात सक्रिय व्यक्तिमत्व असलेले स. रविन्द्रसिंघ मोदी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. रविंद्रसिंघ मोदी यांचे कार्य समाजान्तर्गतच आहे असे नसून सामान्य माणसासाठी आणि सार्वजनिक हितासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या व्यतरिक्त रविंद्रसिंघ मोदी यांची एक पत्रकार, कवि, हिन्दी साहित्यिक, वक्ता आणि यूट्यूबर म्हणून एक आगळी – वेगळी ओळख कायम आहे.
मागील तीस वर्षांपासून रविंद्रसिंघ मोदी हे मराठी, हिन्दी आणि पंजाबी वर्तमान पत्रांसाठी पत्रकारिता करीत आहेत. गुरुद्वाराच्या बातम्या असो की स्थानीक शीख समाजाच्या बातम्या असो ते वर्तमान पत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्यासाठी सर्व प्रयत्न पणाला लावतात. गुरुद्वाराच्या बातम्या व्यवस्थित आणि नीट छापून येण्यासाठी अनेक पत्रकार त्यांची मदत घेतात. त्यांना गुरुद्वारा सचखंड बोर्ड संस्थेत विविध पदावर कार्य करण्याचा सक्षम असा अनुभव प्राप्त आहे. कारण त्यांनी गुरुद्वारा बोर्ड संस्थेत जवळपास दहा वर्षें नोकरी केली होती. त्यावेळी त्यांनी साधारण कलार्क ते बोर्ड अध्यक्षाचा स्वीय सहायक म्हणून मोठी जवाबदारी पार पाडली. त्यांनी मिडिया प्रमुख म्हणून देखील जवाबदारी पार पाडली.
नांदेड येथे वर्ष 2008 साली श्री गुरु ग्रंथसाहेब यांच्या गुरुतागद्दीचा त्रिशताब्दी सोहळा जागतिक स्वरुपाचा साजरा करण्यात आला होता त्याचे नांदेडकराना स्मरण असेलच. त्यावेळी समाजाच्या मागण्या उचलत शासन आणि गुरुद्वारा बोर्ड प्रशासनास अव्हान देणारी त्यांची बिनधास्त पत्रकारिता सर्वांनी पहिली. फक्त पत्रकारिताच नव्हे तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख समोर आली. त्यांनी महानगर पालिका आणि गुरुद्वारा बोर्ड दरम्यान स्थापित होणाऱ्या गुरुतागद्दी जॉइन्ट अकाउंट (संयुक्त खाते ) उघडण्याच्या कृतिचा खुला विरोध दर्शविला होता. त्यावेळेस गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक तत्कालीन पोलीस महानिरीक्षक डॉ परविंदरसिंघ पसरीचा होते. पोलिसांच्या दबावास न जुमानता त्यांनी विरोध मोठा केला व शेवटी ते निर्णय शासनाने मागे घेतले.
या शिवाय त्यांनी वर्ष 2004 मध्ये गोदावरी शुद्धिकरणाची मागणी उचलत श्रमसेवा आंदोलन केले. त्यांचा पुढाकार असल्यामुळे सर्वधर्मी लोकांनी श्रमसेवेत सहभागी होऊन गोदावरी नदीच्या प्रदूषण विषयाकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधले. रविंद्रसिंघ मोदी यांनी गुरुतागद्दी विकास योजना तयार करत असतांना तत्कालीन केंद्रीय नियोजन कमीशनचे उपाध्यक्ष डॉ मोंटेकसिंघ अहलूवालिया यांना गोदावरीच्या नगीनाघाट येथे पन्नास पायर्या उतरवत गोदावरी नदी आणि घाटाची झालेली दुर्दशा दृष्टीस आणून दिली होती. त्यामुळे गुरुतागद्दी विकास योजनेत गोदावरी घाट सुशोभिकरणाचा मुद्दा समाविष्ट झाला आणि गोवर्धनघाट, बंदाघाट पासून नावघाटापर्यंत घाट उभारने आणि सुशोभिकरण कार्य आकारास आले म्हंटल तर वावग होणार नाही.
वर्ष 2004 नंतरच गुरुद्वारात आणि गोदावरी नदीवर साजरा होणाऱ्या ऐतहासिक “तखतस्नान” सोहळ्याची प्रसिद्धी प्रकाशझोतात आली. गुरुद्वारा सचखंड श्री हजुरसाहिब गुरुद्वारा येथे धार्मिक पर्यटन वृद्धिसाठी रविंद्रसिंघ मोदी यांची पत्रकारिता देखील सहायक ठरली यात शंका नसावी. गुरुतागद्दी कार्यक्रम दरम्यान त्यांनी पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगाना, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील पत्रकारांना वृत्त आणि फोटो पाठवण्याची सेवा केली. त्यामुळे गुरुतागद्दी सोहळ्या विषयी सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचली.
कोरोना कोविड संक्रमण काळात त्यांनी बाहेर राज्यात अडकलेल्या नांदेड आणि छत्रपति संभाजीनगर येथील लोकांना घर परतीसाठी यशस्वी प्रयत्न केले. तसेच नांदेड गुरुद्वारा परिसरात अडकलेल्या भाविकांना पंजाब घर परतण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून सतत प्रयन्त केले होते. कपूरथला येथील फैक्ट्रीत अडकून बसलेल्या नऊ ते दहा लोकांची त्यांनी त्यांचे मित्र सरदार बलदेवसिंघ इंजीनियर यांच्या मदतीने घरवापसी करण्यात यश मिळवले. तर राजस्थान येथे अडकलेल्या दोन टॅक्सी चालकांची घर वापसी करण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने यशस्वी प्रयत्न केले. तसेच कोविडच्या उपचारासाठी त्यांनी अनेक नागरिकांना मदत व मार्गदर्शन केले होते.
एक साहित्यिक म्हणून त्यांचा जवळपास तीस वर्षांचा प्रवास सर्वांना अवगत असेलच. हिन्दी मध्ये त्यांचा “अनावश्यक” हा काव्य संग्रह प्रकाशित झाला होता. त्यांनी शंभर ते दीड शे कविता लिहिल्या आहेत. हिन्दी सोबतच त्यांचा मराठीचा लिखाण देखील प्रभावी असा आहे. तीस वर्षें ते मराठीत लिखाण आणि पत्रकारिता करीत आहेत. हजुरसाहिब साहित्य सम्मेलन त्यांनी आयोजित केले होते. श्री मनोज बुब सोबत त्यांनी काव्य मयूर परिवारच्या माध्यमातून नांदेड जिल्हास्तरावर कवि सम्मेलन आणि मुशायरा सतत आठ वर्षें आयोजित केले व मराठी, हिन्दी आणि उर्दू साहित्यिकाना मंच मिळवून दिला. हिन्दी दिवस आणि इतर साहित्य क्षेत्रासाठी त्यांचे योगदान आहे. त्यामुळे त्यांना अलिकडेच भागलपूर येथील विक्रमशीला हिन्दी विद्यापीठातर्फे विद्यावाचस्पति पदवी देऊन गौरविण्यात आले. त्यांनी बि. कॉम. नंतर पत्रकारितेत उच्चस्नातक पदवी मिळवली. स्पर्धा परीक्षा, पीएचडी व शोधप्रबंध लिहिणारे अनेक जण त्यांचे मार्गदर्शन घेतात.
रविंद्रसिंघ मोदी हे एक उत्कृष्ट छाया चित्रकार, एक प्रभावी यूट्यूबर म्हणून देखील सर्वांना परिचित आहेत. सामाजिक बांधिलकीसाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी मागील पंचवीस वर्षात गणेशोत्सवात देखील श्री उत्सव समिती वजीराबाद पोलीस ठाणे आणि शांतता समितीच्या माध्यमातून उल्लेखनीय असे कार्य केलेली आहेत. सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा अनुभव दाण्डगा आहे. दि. 15 जुलै रोजी त्यांच्या वाढदिवस असून त्यांना आभाळभर शुभेच्छा.
लेखक….आनंदा बोकारे पत्रकार,नांदेड.