नवी दिल्ली| उद्धव ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे नवनिर्वाचीत शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत शपथ घेताना यांचा शपथविधी ड़रहावर थांबविण्यात आला असून, अध्यक्षांच्या सूचनेवरून दुसऱ्यांदा लिहून दिलेल्या नुसार शपथ घ्यावी लागली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची झाली होती. या मतदार संघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना होता. यामध्ये ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांचा पराभव केला. त्यानंतर नवी दिल्ली येथील संसदेत सर्वच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.
दरम्यान हिंगोली लोकसभेचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शपथविधी सुरु झाला. नागेश पाटील आष्टीकर यांनी संसदेत मराठीत शपथ घेताना शपथेच्या सुरुवातीला म्हटलं की, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने, दत्त महाराज, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माझे वडील बापूराव पाटील आष्टीकर यांना स्मरुन शपथ घेतो की, मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती श्रद्धा व निष्ठा बाळगीन. आणि भारतीय एकात्मतेचे स्मरण करेन, जे कर्तव्य मला प्राप्त होते, ते नेकीने पार पाडेन.
त्यावर हंगामी लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेत, नागेश पाटील आष्टीकर यांना थांबविले असं चालणार नाही, जे मराठीत लिहिलं आहे तेच वाचावं लागेल, तशीच शपथ घ्यावी लागेल, असं सांगितले. त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी दुसऱ्यांदा एकदा शपथ घेतली. यावेळी त्यांनी अन्य नावांचा उल्लेख टाळत जशी लिहिली आहे तशीच शपथ घेतली.