नांदेड l लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शंकराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे महाराष्ट्रातील नामांकित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती कवी संमेलनाचे आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.


आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि लोकसंपर्कामुळे नांदेड जिल्ह्यातील लोकनेते म्हणून सुपरिचित असणाऱ्या आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस याही वर्षी विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे यांच्या पुढाकारातून यावर्षी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील नामांकित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनाचे उद्घाटन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .


कवी संमेलनात छत्रपती संभाजी नगरचे नारायण पुरी , छत्रपती संभाजीनगरचे निलेश चव्हाण, इगतपुरीचे तुकाराम धांडे , अंबाजोगाईचे मुकुंद राजपंखे , अकोल्याचे किशोर बळी , माजलगावचे प्रभाकर साळेगावकर , जालनाच्या संजीवनी तडेगावकर , अहमदपूरचे राजेसाहेब कदम , परभणीचे केशव खटींग, नांदेडचे शिवाजी अंबुलगेकर , श्रीनिवास मस्के, शंकर राठोड , रोहिणी पांडे आणि मनोहर बसवंते हे कवी आपल्या कसदार कविता सादर करणार आहेत .


भर पावसाळ्यात श्रावण मासात आता कवींच्या काव्यांच्या धारा नांदेडकरांना चिंब करणार आहेत. त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी नांदेडच्या रसिक माय बापानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक माधव पावडे यांनी केले आहे.



