नांदेड l नांदेड शहरात वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामध्ये देगलूर नाका परिसरात तर प्रचंड वाहतुकीचा ताण असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दररोज होत असते. पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले आहे.


सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होतच असते. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महानगरपालिका अतिक्रमण काढत नाही आणि वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरत देखील नाही त्यामुळे नांदेडची वाहतूक व्यवस्था ही भगवान भरोसेच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण वाहतूक कोंडी झाल्यानंतर सक्रियपणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसणे दुरापास्त झाले आहे.

मागील अनेक दिवसापासून देगलूर नाका ते पहिलवान टी हाऊस या रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता दोन्हीही बाजूनी संकुचित करण्यात आला आहे त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या परिसरात शहरातील सर्वात मोठी उर्दू शाळा असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

वाहतूक शाखा आणि महानगरपालिका यांना वारंवार निवेदने देऊन सदरील रस्त्यावरील स्थायी स्वरूपात असलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी करून देखील महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस हे याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत. आजही या रस्त्यावर भंगार आणि जुन्या मालाचे दुकाने लाकडी चौकटी हे साहित्य बिन दिक्कतपणे पडून असते.

त्याचबरोबर अनेक बंद पडलेली जुनी चार चाकी वाहने देखील या रस्त्यावर अविरत उभी असल्याचे दिसून येते. याची अनेक वेळा तक्रार करून हे काढण्याची मागणी केली तरी देखील त्या मागणीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
लवकरात लवकर या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला नाही तर दिनांक 14 फेब्रुवारी रोजी देगलूर नाका चौरसत्यामध्ये रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख बशीर लाला आणि डॉ.प्रदीप भोपळे यांनी दिला आहे. आता या इशाऱ्यानंतर तरी महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस कुंभकर्णी झोपे मधून जागे होतात की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.