हिमायतनगर, अनिल मादसवार| वृक्ष लागवड करून झाडे लावा – झाडे जगवाचा संदेश वनक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जिल्हाभरात दिला जात आहे. परंतु हिमायतनगर येथील वन परिक्षेत्र अधिकारी नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम करत असल्याने सागवान तस्करांचे “जंगल में मंगल” होत असल्याने वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. सागवान तस्करात तेलंगणा राज्यातील तस्करांचा समावेश असताना वर्षभरात वनविभागाने सागवान तस्करांच्या बाबतीत एकही कार्यवाही केली नसल्याने वनाधिकाऱ्याच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
एकीकडे सर्वत्र जागतिक तापमान वाढत असल्याचे संकट उभे असताना, दुसरीकडे मात्र लाकूड तस्करामुळे जंगल भुई सपाट होण्याच्या मार्गावर आहे. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या काळात हिमायतनगर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड करून, वृक्ष जोपासना करीत वृक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यामुळेहिमायतनगर तालुक्यातून सागवान, गहरी, धावंडा, बारतोंडी, खैर, मोहफुल या झाडांच्या कत्तलीवर विशेष नियंत्रण ठेवून वनपरिक्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला होता. तसेच उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या सोयीसाठी पाणवठे तयार करून तहान भाग्विली जात होती. यामुळे ऐन उन्हाळ्यात सुद्धा जंगल परिसर हिरवागार दिसत असल्याने मानवी वस्तीकडे येणाऱ्या प्राण्यांची संख्या कमी झाली होती.
परंतु गेल्या दोन वर्षांपासून हिमायतनगर वनपरीक्षेत्राची वाताहत झाली आहे. परिणामी दरेसरसम, दुधड, पवना, वाशी, दरेगाव, एकघरी, टाकराळा, दाबदरी, वाई, आदी वन क्षेत्रात छुप्या पद्धतीने वृक्ष तोड केली जात आहे. हि बाब संबंधित विभागाला माहित असताना वनसंरक्ष करणारे अधिकारी कर्मचारी नांदेड सारख्या शहराच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. त्यामुळे परिसरातील सागवान तस्कराने जाळे पसरत चालले आहे. तसेच हरीण, रोही, रानडुक्कर, काही वेळा तर वाघाचा संचार होऊन वन्य प्राणी मानवी वस्त्याकडे फिरण्याची संख्या वाढली असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकाऱयांच्या बेपर्वाही वृत्तीमुळे तेलंगणा – मराठवाड्याच्या सीमेवरील जंगल भकास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील तीन वनपाल, १० वनरक्षक, वनमजूर २ कार्यरत आहेत. मात्र खुद्द वनपरिक्षेत्र अधिकारी हेच नांदेडवरून उंटावरून शेळ्या हाकत असल्याने वनपरिक्षत्रातील संबंधितांवर त्यांची वाचक राहिली नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी हे आठ आठ दिवस हिमायतनगर येथील कार्यालयात येत नसल्याने इतर कर्मचारी देखील आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. याचाच फायदा तस्कर घेत असून, जंगलात सर्रास वृक्ष तोड होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील रोपवाटिकेच्या क्षेत्रातही दिवसेंदिवस दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. याबाबत प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे एक प्रकारे सागवान तस्करीला वनपरिक्षेत्र अधिकारी यांची मूक संमती तर नाही ना अशी शंका पर्यावरणप्रेमी नागरिक व्यक्त करत आहेत.