सध्याची राजकीय परिस्थिती पाहता “बौद्धिक क्षमता, विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी” या संकल्पना आता कालबाह्य होत चालल्या आहेत. एकेकाळी पक्षासाठी आयुष्य घालवणारा, गावोगावी जनतेच्या समस्या सोडवणारा आणि आपल्या विचारांवर ठाम राहणारा कार्यकर्ता आजच्या व्यवस्थेत अप्रासंगिक ठरत आहे. निवडणुकीच्या मैदानात आता विचार, प्रामाणिकपणा किंवा जनसेवा नव्हे—तर पैसा, थाट, लवाजमा आणि गुंडगिरी या गोष्टीच राजकारणाचे नवे मापदंड बनले आहेत.


आज कार्यकर्त्यांचा वापर फक्त संख्याबळ वाढवण्यासाठी, सभांमध्ये घोषणाबाजी करण्यासाठी आणि नेत्याचे गुणगान गाण्यासाठीच मर्यादित राहिला आहे. प्रचार-प्रसार ही गोष्ट आता “इव्हेंट मॅनेजमेंट”च्या बाजारपेठेत गेलेली आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी गर्दी भाड्याने आणणारे लोक, भाषणांना टाळ्या पिटण्यासाठी तयार असलेले समूह — हे सर्व पैशावर उपलब्ध आहे.


या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर, खऱ्या अर्थाने काम करणारा आणि समाजातील प्रश्नांवर बोलणारा तळागाळातील कार्यकर्ता मात्र मागे पडतो. त्याच्याकडे बुद्धिमत्ता, सामाजिक दृष्टी, आणि आपल्या विभागाच्या समस्या सभागृहात मांडण्याची प्रामाणिक इच्छा असते, पण आजच्या ‘नव्या’ राजकीय यंत्रणेत त्याला संधी मिळणे कठीण झाले आहे.


याला केवळ व्यवस्था नव्हे, तर मतदारांची मानसिकताही तितकीच जबाबदार आहे. आज मतदार एखाद्या साध्या, मेहनती कार्यकर्त्याला नाकारतो आणि एखाद्या निष्क्रिय, पण थाटात असलेल्या उमेदवाराला पसंती देतो. एखाद्याकडे गाडी, पैसे आणि लोकांना प्रभावित करणारा देखावा असेल तर तोच जिंकतो, जरी त्याच्याकडे समाजासाठी काहीही करण्याची दृष्टी नसेल.

त्यातही अनेक वेळा कार्यकर्त्यांचा वापर करून घेणारे धनाढ्य उमेदवार त्यांना नंतर बाजूला करतात. काही वेळा तर त्यांच्या राजकीय आयुष्यालाच कटकारस्थान करून संपवले जाते. त्यामुळे समाजहितासाठी लढणारे प्रामाणिक कार्यकर्ते हतबल होतात आणि राजकारणात प्रवेश करण्याचे स्वप्नही सोडून देतात.
परिणामी, सभागृहात पोहोचणारे प्रतिनिधी बौद्धिक आणि नैतिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे शहरांच्या विकासाचा आलेख खालावत आहे. नगरपरिषद, महानगरपालिका परिसरात कोटींच्या गाड्या थाटात उभ्या असतात, पण नागरिकांच्या मूलभूत समस्या तशाच कायम राहतात.
मतदार दारू, पैसे आणि तात्पुरत्या सुविधा यांच्या मोहात पडत असल्याने, पैशानेच निवडणूक जिंकता येते हे सर्वच पक्षांनी कबूल केले आहे. पक्षनिष्ठा, विचारसरणी हे सर्व दुय्यम ठरले आहे. पैसा आणि प्रभावाच्या जोरावर पक्ष बदलूनही यश मिळवता येते, अशी प्रवृत्ती दृढ होत चालली आहे.
हे चित्र लोकशाहीसाठी घातक आहे. पण दुर्दैवाने कोणताही पक्ष या दिशेने चिंतन करताना दिसत नाही. उमेदवारी देताना प्रामाणिकता, बुद्धिमत्ता आणि कामगिरी बाजूला ठेवून केवळ पैशाची ताकद मोजली जाते.
यामुळे आगामी काळात खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवणे हे “स्वप्नच” ठरणार आहे. मग प्रश्न असा उरतो — कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी? आणि कोणत्या लोकशाहीसाठी?
लेखक –गोविंद मुंडकर


