मुंबई| राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरीत करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यातील बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविणार आहेत.
राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी पाठविण्यात येणार आहे. शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी ‘चलो मुंबई’ असा नारा गावोगावात महिला देत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन ‘उमेद’ संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती ‘उमेद’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लेक लाडकी अभियान, महिलांना ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास योजना यापूर्वीच सुरु झाली आहे. व्यक्तिचे नाव लिहिताना त्यामध्ये पित्यासोबत आता मातेचे नाव टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा विविध निर्णयांमुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांत अधिक योजना आणत आहेत. मुख्यमंत्री हे आपले मोठे भाऊ आहेत, अशी भावना राज्यातील महिलांमध्ये निर्माण होत आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना महिलांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया
मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखाएवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत. या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला. १४ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून जर्मन भाषेचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा शब्दात ई संवादात सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील साक्षी सुरुशे यांनी लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनपूर्वीच आम्हाला ओवाळणी दिली, अशी हृदयस्पर्शी भावना मैना कांबळे यांनी व्यक्त केली. पल्लवी हराळे यांनी शिलाई व्यवसाय वाढवता येईल असे सांगताना मुख्यमंत्री स्वतः बोलले याचा आनंद योजनेच्या लाभपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. उमेद अभियानाने महिलांना आर्थिक उन्नतीची उमेद दिली अशा शब्दात कविता कंद यांनी शासन बचतगटांना करीत असलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे.
मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने १०८ योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या संवादावेळी केले.