बिलोली, गोविंद मुंडकर| गेल्या दोन महिन्यात बिलोली तालुक्यातील मिनकी व केसराळी येथील तीघांनी घरची हालाखीची परिस्थिती व आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका महिन्यातील तीन आत्महत्या यामुळे समाजमन ढवळून निघत असतानाचे चित्र दिसून येते.


गरीबी आर्थिक परिस्थितीमुळे होण-या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक संघटनांनी समुपदेशनाचे कार्यक्रम राबविणे व शासनाच्यावतीने रचनात्मक ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या महिन्यातील दि. ९ जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील मिनकी येथील एका १८ वर्षीय युवकाने शैक्षणिक साहित्य, नवीन कपडे व मोबाईल घेण्यासाठी आपल्या शेतकरी बापाकडे पैशाची मागणी केली होती. ती मागणी पुर्ण झाली नसल्याने मुलाने रागाच्या भरात शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुसऱ्याच दिवशी मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आपण मुलाच्या गरजाही पुर्ण करू शकलो नाही या पीडित भावनेने पित्याने मुलाने गळफास घेतलेल्या दोरीनेच स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मिनकी येथील पिता पुत्राच्या आत्महत्येची घटना ताजी असताना दि. ९ फेब्रुवारी रोजी बिलोली तालुक्यातीलच केसराळी येथील एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने घर बांधकामासाठी खाजगी व्यक्तींकडून घेतलेले सावकारी कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून गावा जवळच्या नात्यातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या वेगाने पसरलेल्या.

बिलोलसह सबंध महाराष्ट्रात आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यांच्या होणा-या आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. असे मत नोंदविण्यात आले. आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनानेही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजसेवक,सामाजिक संघटना आणि शासन काय रचनात्मक उपाययोजना करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.