नायगांव/नांदेड| मांजरममध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची जूनी ईमारत मोडकळीस आलेली असून संभाव्य अपघात टाळण्यासाठी रुग्णसेवेसाठी तयार असलेल्या नविन ईमारतीचे तातडीने लोकार्पण करावे अशी मागणी नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा. भवरे यांनी केली असून, त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.



नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम प्राथमिक आरोग्य केंद्राची जूनी ईमारत तब्बल ४० वर्षापूर्वीची असल्याने अत्यंत जीर्ण झालेली आहे. येथे तिन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून दररोज जवळपास २०० बाह्यरुग्ण तपासणी होत असते. या केंद्राच्या अखत्यारित दहा उपकेंद्रासह त्याअंतर्गतची अनेक गांवे येतात.जून्या मोडकळीस आलेल्या ईमारतीतच औषधी साठा असल्याने तो खराब होण्याची तसेच,स्थानिक अधिकारी- कर्मचाऱ्यांना रुग्णसेवा देतांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.



त्यानुषंगाने तातडीने लक्ष देऊन बांधकाम पूर्ण असलेल्या नवीन ईमारतीचे हस्तांतरण करुन घ्यावे व या ईमारतीचे लोकार्पण करुन त्यातून रुग्णांना सुलभ,तत्परतेने व परिणामकारक वैद्यकीय सेवा पुरवावी अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे पांडुरंग शिंदे व लक्ष्मणराव भवरे यांनी निवेदनातून केली असून त्याच्या प्रति जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही दिल्या आहेत.


दरम्यान,सद्या पाऊस सुरु असल्याने नविन ईमारतीत औषधी साठा ठेवण्यात येत असून ईमारत परिसरात राहिलेले कामे पूर्ण करण्याचे निर्देश स्थानिक ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या संबधितांना देऊन लवकरच लोकार्पणासह नवीन ईमारतीतून रुग्णसेवा सुरु व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ.संगीता देशमुख म्हणाल्याचे शिंदे यांनी सांगीतले.



