हिमायतनगर,अनिल मादसवार। संबंध भारतात श्री परमेश्वराची एकमेव उभी मुर्ती असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या मुर्तीच्या कामानीला अंदाजे ५० किलोची चांदीची झळाळी लावण्यात आली आहे. यामुळे श्री परमेश्वर मंदिराच्या वैभवात भर पडली असून, मंदिराच्या विकास कामाची घौड दौड अविरत चालू असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तातुन परमेश्वर मंदिर कमिटीच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केल जात आहे.
गेली अनेक वर्षपासून श्री परमेश्वर मंदिराचा विकासात्मक आलेख आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी पदसिद्ध अध्यक्ष, सर्व संचालकांना विश्वासात घेऊन मंदिर परिसरात शेकडो व्यापारी गाळे उभारली आहेत. श्री परमेश्वर मंगल कार्यालय, नाममात्र दरात भक्त निवास उभारले आहे. ही कामे यशस्वी झाल्यानंतर ट्रस्ट कमिटीने अनेक वर्षापासून असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर विलोभनीय टाईल्स बसविण्यात आली. तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या धर्तीवर परमेश्वर मुर्तीच्या कामानीला चांदीची झळाळी बसविली आहे. यासाठी तब्बल पन्नास किलो चांदीचा उपयोग करण्यात आला असून, मुर्तीच्या डोक्यावर झुंबर असलेली छत्री उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नक्षीकाम केलेल्या चांदिच्या झळाळीमुळे मुर्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून, भाविक भक्तांकडून मंदिर कमिटीने गतवर्षी घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने समाधान मानले जात आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी मंदिर ट्रस्ट कमिटी कडुन आर्थिक स्थिती पाहत २० किलो चांदी खरेदी करून ठेवली होती. त्यात पुन्हा भर टाकुन मुंबई येथील कारागीराकडुन चांदीची नक्षीदार झळाळी कामानीला लावण्यात आली आहे. श्रीच्या डोक्यावर झुंबर असलेली छत्री उभारल्या नंतर सुरक्षेच्या दृष्टीने आकर्षित असा काच बसविण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.
मंदिर परिसरात 49 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेसाठी तयारी
वाढोणा, वारणावती, हिमायतनगर येथील प्रसिद्ध व जाज्वल्य ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिरात मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील दुरवरुन भाविकभक्त दर्शनासाठी गर्दी करीत असतात. मंदिरात आलेल्या सर्व भाविकांच्या आणि मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास 5 लाख रुपये खर्च करून एच डी क्वालिटी चित्रीकरण होणारे ४९ सीसीटीव्ही कॅमेरे मंदिरांच्या गाभाऱ्यासह परमेश्वर मंगल कार्यालय, परमेश्वर बसस्थानक परिसरात बसविण्यात आले आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंदिर परिसरासह भारतीय स्टेट बैंकेपासून होणाऱ्या हालचालीचे चित्रण कैद होणार असल्यामुळे भविष्यात सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग विविध घटना घडामोडीच्या तपासासाठी व सुरक्षेच्या दृष्टीने होणार आहे.