नांदेड। शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक तथा मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. राम वाघमारे यांनी केले.
नांदेड येथील श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयात गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणराव चव्हाण विधि महाविद्यालय व श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. विना पाटील या उपस्थित होत्या.
पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांना परिपूर्ण व सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला तंत्रज्ञानात अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल काढून पुस्तकांकडे वळवण्याचे आव्हानात्मक कार्य शिक्षकांसमोर असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश नळगे यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. अनुराधा राऊत, मिलिंदकुमार जोशी, डॉ. राठोड संजीवनी, डॉ. सरिता पाटील, राम कदम, माधव पुयड, स्वप्निल दरणे, शरद घोगरे, लोभाजी हंबर्डे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव कल्याणकर व विशाल थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार सीमा सय्यद यांनी मानले.