हिमायतनगर| हिमायतनगर शहरातून औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडून सिरंजनी बायपास अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या अंतर्गत रस्त्यावरून मानव विकास मिशनची बससेवा चालविणे जीवघेणे ठरत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे तात्काळ लक्ष देऊन ४५ वर्षांपासून खितपत पडलेल्या या रस्त्याला शासन नियमानुसार नंबर देऊन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून रहदारीची वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी सिरंजनी येथील बालिका पंचायत व सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे केली आहे.


सार्वजनिक बांधकाम विगाग व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना देण्यात आलेल्या निवेदनात बालिका पंचायतच्या विद्यार्थिनी व सरपंच सौ करेवाड यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर पळसपूर रोड व हिमायतनगर, सिरंजनी रोड यामधील जोडरस्ता हा सिरंजनी भागातील एकंबा, कौठा ज., कौठा तांडा, सिरपल्ली, शेल्लोडा या भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी महत्वपूर्ण मुख्य रस्ता आहे. सदरील रस्त्याला नंबर नसल्यामुळे शासनाचा निधी प्राप्त होण्यासाठी अडचणी येत आहेत. आजघडीला या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. हा अंतर्गत रस्ता अतिशय चिखलमय झाल्याने रहदारी बंद झाली.


याच रस्त्यावरून जवळपास तिनशे मुली मानव विकास मिशनच्या बस ने येजा करीत असतात. आता पावसाळ्यात चिखलामुळे बस सेवा वारंवार बंद होत असल्यामुळे शालेय विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघातांची भीति ही व्यक्त होत आहे. शेतकर्याना सुद्धा चिखलमय व खड्डेमय रस्त्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून या अंतर्गत रस्त्याला शासन नियमानुसार नंबर देण्यात येवून रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करून रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करून द्यावा. अशी मागणी सिरंजनी ग्रामपंचायतींच्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्यासह बालिका पंचायतच्या सरपंच कु. रागीनी शिवाजी देशमाने, उपसरपंच कु. अनुजा गजानन कलेवाड, ग्रामसेविका कोमल मारोती करेवाड, ग्रामसेविका श्रीमती यु.जे. पठाण यांनी केली आहे.
