हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| नांदेड – किनवट राज्य रस्त्यावरील हिमायतनगर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्रकुंड बाणगंगा धबधबा खळखळ वाहू लागला आहे. विदर्भ- मराठवाड्यात सीमेवरून वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने सळसळ करत वाहू लागला आहे. हि बातमी समजताच आज सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी सहस्रकुंडची वाट धरली असून, पर्यटक सहस्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यास गर्दी करत आहेत.
नांदेड – किनवट राज्य रस्त्यावरील इस्लापूर पासून ४ कि.मी.अंतरावर असलेला सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी दृश्य प्रती वर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. परंतु यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला धबधबा पाण्या अभावी पाहत आला नाही. तर चार वर्षांपूर्वी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यापर्यंत धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांना वाट पहावी लागली होती. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला होता. यंदा देखील तीच परिस्थिती असल्येने पर्यटक धबधबा प्रवाहित होण्याच्या प्रतीक्षेत होते. यंदा उशिरा का होईना…धबधबा सुरु झाल्याचे समजताच पर्यटकांची गर्दी उसळली होती.
यंदा मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा आणि इस्लापूर व हिमायतनगर भागातील नाले भरून वाहू लागले. या ओढ्याचे पाणी नदीत मिसळून वाहिल्याने हा धबधबा सुरू झाल्याचे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच वर्षभरापासून धबधबा पाहण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांची पाऊले सहस्रकुंड धबधब्याच्या दिशेने आपसूकच वळल्याचे पाहावयास मिळते आहे.
रामायण कालीन अख्याईका असलेल्या या नैसर्गिक धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची पाऊले या दिशेने वळत आहेत. १०० ते १५० फुटावरून पडणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विहंगम दृश्याचा आनंद पर्यटक ८० फुट उंचीच्या मनोर्यावरून घेत आहेत. येथील संपूर्ण परिसराने देखील हिरवा शालू पांघरला असून, या धबधब्याच्या काठावर पुरातन कालीन महादेव मंदिर आहे. या ठिकाणी श्रावण मास, दर सोमवारी दर्शनसाठी भक्त येतात. आज रविवारची गर्दी पाहता या ठिकाणी पोलिस अथवा मंदिर प्रशासनाने कायमस्वरूपी सुरक्ष गार्ड तैनात करावे जेणे करून कोणतीही दुर्घटना होणार नाही अशी मागणी सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे.