देगलूर (गंगाधर मठवाले) शहापूर ते कोटेकलूर या रस्त्याचे उन्हाळ्यात गिट्टी-डांबर टाकून काम करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरु होताच जागोजागी खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता मजबूत करण्यासाठी पुन्हा गिट्टी-डांबर टाकणे अपेक्षित असताना, ठेकेदाराने केवळ मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचा थातूरमातूर प्रकार सुरू केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात रस्ता बनविताना गिट्टी-डांबराचे प्रमाण अत्यल्प वापरले गेले. त्यामुळे रस्ता पूर्णपणे तयार होण्यापूर्वीच वाहनांच्या दाबामुळे डांबर उखडून रस्ता उघडा दिसू लागला. त्यावेळी पुन्हा गिट्टी-डांबर टाकून दुरुस्ती केली जाईल, असे कामगारांनी सांगितले होते. परंतु त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. आता खड्ड्यांवर मुरुम टाकून काम भागवले जात असल्याने लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त होत आहे.



कोट्यवधींचा सार्वजनिक निधी खर्चून तयार होणारे रस्ते काही महिन्यांतच खराब होत असल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. त्यामुळे शहापूर-कोटेकलूर रस्त्याच्या कामकाजाची चौकशी करून जबाबदार ठेकेदार व विभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.





