हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. ठिकठिकाणी शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले होते.


दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या हर्षोल्हासात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पुढाकारातून साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान करून आपण समाजाचे काही देणं लागतो हे दाखवून देत सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता.

गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य दिव्य अशी शोभायात्रा येथील श्री परमेश्वर मंदिरापासुन काढण्यात आली. सायंकाळी चार वाजता श्री परमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, पोलीस निरीक्षक अमोल भगत, डॉ.राजेंद्र वानखेडे, डॉ गणेश कदम, माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, विठ्ठल दादा ठाकरे, गजानन तुप्तेवार, राम नरवाडे, संजय माने, विलास वानखेडे, राजू पाटील शेलोडेकर, अन्वरखान पठाण, किशनराव वानखेडे, सुभाष शिंदे, निकु ठाकूर, लक्ष्मण डांगे, रामभाऊ सूर्यवंशी, वामनवराव मिराशे, बंडू अगुलवार, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष गजानन ठाकरे , किरण माने, अरविंद वानखेडे , राज ढोणे , तेजस हारणे, आणि शहरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अश्वावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व आरती करण्यात आली.

यावेळी जय भवानी…. जय शिवाजी…. अश्या घोषणांनी आसमंत दणाणून निघाला होता. लगेचच भव्य शोभा यात्रेला डीजेच्या तालासुरात काढण्यात आली. श्री परमेश्वर मंदिरापासून निघालेली शोभायात्रा सराफा लाईन, बजरंग चौक, छत्रपती शिवाजी चौक, पोलीस ठाणे, गणेश चौक, सराफ लाईन, लकडोबा चौक ते परत श्री परमेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर समारोप करण्यात आला. यावेळी युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले पोस्टर हाती घेऊन डीजेच्या तालावर ठेका धरला होता.

जयंती मिरवणुकीचे आगमन होताच चौकाचौकात महिला – पुरुष नागरिकांनी शोभायात्रा पाहण्यासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करत सामील झालेल्या युवकांना सरबत, पेयजल आणि वर्धमान मेन्स वेयरच्या वतीने आईस्क्रीमच वितरण करण्यात आले. एकूणच जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या युवकांनी परिश्रम घेतले.
शिवजन्मोत्सव आयोजित विविध कार्यक्रम पार पडले असून, आगामी दिनांक ०४ मार्च रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होऊन कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती हिमायतनगरच्या वतीने करण्यात आलं आहे.