हिमायतनगर| शहरात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, रस्ते व नाल्यांची (Lack of roads) योग्य व्यवस्था नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक ४ मधील घराघरासमोर व परिसरात साचलेल्या पाण्यातून डबक्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.


हिमायतनगर (Himayatnagar) नगरपंचायतीकडून पाण्याच्या टाकीच्या वरील ईदगाह मैदान पाठीमागे असलेल्या वॉर्ड नंबर ४ मधील वस्तीत नाल्या रस्ते केले नसल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा कोणताही पर्याय नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी लहान मुले, वृद्ध आणि शालेय विद्यार्थी यांना या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देणे आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून परीसरात पाण्याचे डबके साचणार नाहीत यासाठी ठोस पाऊले उचलावी आणि जंतुनाशक फवारणी करून संभाव्य साथीच्या आजाराच्या धोक्यापासून नागरिकांना वाचवावे अशी मागणी करण्यात येत आहे.



