किनवट, परमेश्वर पेशवे| जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ऑगस्ट महिन्यामध्ये आशा वर्कर पदाची भरती करण्यात आली होती ती भरती नियमबाह्य पद्धतीने झाली असून ती भरती रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर जलधरा येथील पाच महिलाने आमरण उपोषण करण्यास सुरुवात झाली असून या उपोषणास अद्याप पर्यंत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने या उपोषणर्थि महिलांनी नाराजी व्यक्त केली.
सदरील केंद्रा अंतर्गत येणाऱ्या या आशा वर्कर पदासाठी तब्बल 12 महिलानी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण यामध्ये एकाच महिलेला ग्रामसभेचा ठराव देऊन त्या महिलेची निवड करण्यात आली. व इतर कुठल्याही महिला उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले नसल्याचा आरोप या उपोषणार्थी महिलांनी केला. यामध्ये सौ अंजना भिवाजी डवरे, मंगल श्रीहरी धनवे ,विमल गोविंद डोईफोडे ,संजना प्रकाश बेले, मीना खंडू शिरडे, या महिलांनी दिनांक 19 पासून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
दिनांक 15 डिसेंबर पर्यंत सदरील पद रद्द करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी या महिलांनी केली होती. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नांदेड येथील मीटिंगमध्ये असल्याची प्राथमिक माहिती त्यांच्याकडून उपलब्ध झाली.किनवट येथील तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी व महिलांना न्याय मिळवून द्यावा अशा स्वरूपाची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.