किनवट, परमेश्वर पेशवे। अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) उत्तीर्ण होऊन आदिवासी , दुर्गम , डोंगरी तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांनी सैनिकी शाळेत प्रवेश मिळविल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील गोकुंदा येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेतलेले आशय आशा राजा तामगाडगे , कनिष्क पुष्पाताई कपिलकुमार भवरे यांचा सैनिक शाळा चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे आणि अनवित अश्विनी राहुल तामगाडगे याचा सैनिक शाळा रेवा (मध्यप्रदेश) येथे प्रवेश झाला असून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे.
बिनपगारी रजा घेऊन तंत्रस्नेही शिक्षक राहूल तामगाडगे यांनी सतत 3 महिने या विद्यार्थ्यांचा सराव घेतला होता. 300 गुणांपैकी आशय 264 , कनिष्क 243 व अनवित 229 गुण घेऊन कठीण परिश्रम, कुशाग्र बुद्धी, जिद्द आणि अभ्यासू वृत्ती यामुळेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मुले असलेल्या या तिन्हीही जीवलग मित्रांनी या राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेमध्ये यश मिळवून उज्ज्वल भविष्याचं एक दालन पादाक्रांत केल्याबद्दल प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, पीएम पोषण आहार योजना अधिक्षक अनिलकुमार महामुने, मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, विस्तार अधिकारी (शिक्षण) बालाजी मोकळे , प्रभारी केंद्र प्रमुख ग.नु. जाधव , प्राचार्या शुभांगीताई ठमके ,मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, निवृत्त मुख्याध्यापक रामजी कांबळे , मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे, नाटककार यादव तामगाडगे, रामा भवरे, मुख्याध्यापक रवि भालेराव आदिंनी त्यांचे कौतुक केले आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ची स्वावलंबी एक स्वतंत्र स्वायत्त प्रीमियर परीक्षा संस्था म्हणून स्थापन केली आहे. तसेच संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सैनिक स्कूल सोसायटी (SSS) एक स्वायत्त संस्था स्थापली आहे. ही संस्था सैनिक स्कूल चालवते. सैनिक शाळा या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा आहेत. सैनिक शाळा नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA), खडकवासला (पुणे), इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला आणि अधिकाऱ्यांसाठी इतर प्रशिक्षण अकादमींमध्ये सामील होण्यासाठी कॅडेट्स तयार करतात. सध्या देशभरात एकूण 33 सैनिक शाळा आहेत.
अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) मधील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित सैनिक शाळा सहावी आणि नववीच्या स्तरावर प्रवेश देतात. देशपातळीरील काठिण्य पातळी असलेल्या परिक्षेस इयत्ता पाचवीत शिकणारे विद्यार्थी पात्र असतात. अशा ह्या अवघड परिक्षेत प्रचंड मेहनत घेऊनच आशय, कनिष्क व अनवित या सागवान झाडीतील रत्नांनी उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.