नांदेड| आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे 21 ते 25 मार्च दरम्यान पार पडलेल्या आर्चरी अंडर 10 NTPC नॅशनल स्पर्धेमध्ये आरोही शंकर जाधव हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत राष्ट्रीय स्पर्धेत ओव्हर ऑल रँकिंगमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.


वैयक्तिक एलिमिनेशन प्रकारात तिने तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मनिपुर, तेलंगणा, झारखंड, इत्यादी राज्यातील मुलींना हरवत तिने महाराष्ट्राला एक सिल्वर पदक जिंकून दिले.आरोही जाधव ही मागील 1 वर्षापासून नांदेड येथे अमोल बोरिवाले यांच्याकडे इंडियन आर्चरी अकादमी येथे प्रशिक्षण घेत आहे. आरोहीच्या यशाचे श्रेय तिने आंतरराष्ट्रीय कोच तथा NIS कोच अमोल बोरिवले यांना दिले आहे.


मुखेड तालुक्यातील राठोडवाडी सारख्या छोट्या गावातून आरोही कठोर मेहनत, नियमित सरावातून पुढे आलेली आहे.आज नांदेड मध्ये शाळा, खाजगी शिकवणी,नीट, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागलेले असताना खेळामध्ये देखील करियर निर्माण केले जाऊ शकते हे आरोही जाधवने सिद्ध करून दाखवले आहे. आरोहीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
