हिमायतनगर,अनिल मादसवार| देवाच्या नामस्मरणात अपार शक्ती आहे, त्यामुळे सर्वानी नामस्मरण करून पुण्य प्राप्त करून घ्यावे. यंदा सोमवार पासून श्रावण मासाचा हा विशेष योग ७१ वर्षानंतर आलेला आहे. त्यानिमित्ताने येथिल श्री परमेश्वर मंदिरात दिनांक ०५ ऑगस्टपासून ओम नमःशिवाय नामजप यज्ञाचा आयोजन करण्यात आले आहे. या नामजप यज्ञात पंचक्रोशीतील जास्तीत जास्त महिला पुरुषांनी सहभाग घ्यावा आणि आपले जीवन सफल करून घ्यावे असे आवाहन पपू. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केले.



पवित्र श्रावण महिनाभर अखंड शिवनाम ओम नमःशिवाय नाम जप सुरु राहणार असल्याने त्या संदर्भातील चर्चासत्र गुरुवारी दुपारी येथील श्री परमेश्वर मंदीरात संपन्न झाले. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी भेट देऊन प्रथमतः श्री चे दर्शन घेतले. त्यानंतर येथील सभागृहात आयोजित बैठकीस उपस्थिती दर्शविली. यावेळी मंदिर संस्थांनच्या वतीने महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी बालयोगी व्यंकट स्वामीजींचा शाल पुष्पहार अर्पण करून स्वागत सत्कार केला. बैठकीत मार्गदर्शन करताना बालयोगी व्यंकटस्वामी म्हणाले कि, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टकडून पवित्र श्रावण मासात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात भर म्ह्णून याही वर्षी ओम नमःशिवाय अखंड नामजाप यज्ञ देखील होणार आहे. हा नामजप यज्ञ अविरत महिनाभर चालणार असून, यात दिवस आणि रात्र असे दोन सत्र ठेवण्यात आले आहे.



सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत महिलाचा गट आणि सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पुरूष भाविकांचा गट या ओम नमःशिवाय अखंड नामजाप यज्ञास बसणार आहे. महिन्यातील तीस दिवस चालणाऱ्या यज्ञात सर्वानी मेहनत घेऊन यशस्वी करण्यासाठी वेगवेगळे ग्रुप तयार करून दररोज सर्वाना ओम नमःशिवाय अखंड नामजाप यज्ञात बसण्याची संधी मिळावी असे नियोजन करावे. अश्या सूचना देखील पपू.बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, पिंपळगावकर यांनी केल्या. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर जागृत देवस्थान आहे, सनातन धर्मातील पवित्र असा महिना श्रावण महिना आहे. संपूर्ण भारतभर जगभर या महिन्यात विविध धार्मिक उपक्रम घेऊन भगवान शिवाची आराधना केली जाते. उत्तर भारतात श्रावण महिना पौर्णिमेपासून साजरा केला जातो तर दक्षिण भारतात आमावस्येपासून साजरा केला जातो.



यंदाचा श्रावण मास ७१ वर्षानंतर आलेला असून, सोमवार पासून याची सुरुवात होणार असल्याने अतिशय महत्वाचा पर्वकाळ आहे. ओम नमःशिवाय नामजप यज्ञात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन भगवान भोलेनाथाच्या ओम नमः शिवाय नामाचं नामस्मरण करावं. जीवन जगताना जनता अजाणता खूप काही दोष आपल्यात येतात. त्या दोषांचं निवारण करण्यासाठी एकमवे उपाय म्हणजे भगवंताच नामस्मरण आहे. त्यामुळे हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील लोकांनी नावनोंदणी करून नामस्मरण यज्ञात सहभागी व्हावं आणि या जन्मीचं पुण्य पदरात पाडून घ्यावं असे म्हणून पवित्र श्रावण मासाच्या आगमनाचा हिमायतनगर वासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील व्यापारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



