हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील बरेच मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. ज्या गावाच्या ज्या भागात नवीन रस्ते करण्यात आले आहेत, त्या कामाचा दर्जाच दिसून येत नाही. त्याचप्रमाणे पांदण रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे शेती विकासाला सुद्धा ब्रेक लागल्याने जगाच्या पोशिंद्याची यामध्ये परवड (When will the actual action of Padan road development scheme in Hadgaon taluka be done…!) होताना पाहायला मिळत आहे.


पांदण रस्ते विकासासाठी असलेल्या योजनाच विद्यमान आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.10 जाने 2025 ला घेण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये महसुल विभागद्वरे पांदण रस्ता खुले करण्यासंबधी फार गजावजा करण्यात आला होता. या बाबतीत अनेक वेळा तहसिलदार हदगांव यांचेकडे माहीती घेण्याच प्रयत्न केला. परंतु त्यांनी याबाबतीत प्रतिसाद दिला नाही पांदण रस्त्याचा शासनाचा कार्यक्रम कागदावरच दिसत असल्याने या बाबतीत विद्यमान आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून पुढे येऊ लागली आहे.

जनता दरबार मध्ये विद्यमान आमदार यांनी प्रशासनाला ज्या कडक सुचना नागरिकांच्या प्रश्ना बाबतीत केल्या होत्या. त्यांचा जवळपास दिड महीन्याचा कालवधी लोटला असला तरी त्यांचा परिणाम प्रशासनावर सध्या तरी झालेल दिसून येत नाही. ग्रामीण भागातील लोक वर्गणीतून पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याचा मनोदय त्रस्त शेतक-यानी व्यक्त केला आहे. एकीकडे देशाने विज्ञानासह विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. मात्र दुसरीकडे कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांना शेतीचा व्यवसाय करणे सोयीचे व्हावे यासाठी कोणतीही ठोस उपायोजना होत नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.

लोकवर्गणीतून पांदण रस्ते दुरुस्ती करावी अशी वेळ येत शेतकरी वर्गावर येत असेल तर हा विकासाचा दृष्टीने प्रचंड विरोधाभास आहे. ज्यांना मायबाप म्हणून संबोधले जाते त्यांचे मात्र, शेती व्यवसायासाठी महत्त्वाच्या असलेल्या शेतरस्त्याकडे दुर्लक्ष होणे हे योग्य नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. परिणामी पदरमोड करून आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या व मनाची श्रीमंती असलेल्या शेतकऱ्यांना लोकवर्गणीतून पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळ येत यावी हे दुर्देव आहे. नागरिक शेतक-याना शेतात जाणारे पांदण रस्ते, शहरात, शहराला व शेजारच्या गावाला जोडणारे मुख्य रस्ते चांगले असणे महत्त्वाचे आहे.

रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना जागली करिता, पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. तसेच रात्रीच्या वेळी कुणी आजारी पडले तर शेजारच्या मोठ्या गावात किंवा शहराच्या ठिकाणी उपचारार्थ दवाखान्यात यावे लागते. मात्र शेतशिवारातील पांदण रस्ते आजही शासन दरबारी दुर्लक्षित असल्याने शेती विकासाला ब्रेक लागत पांदण रस्त्याच्या दुरवस्थेने शेतीची वाट बिकट झाली आहे. पांदण रस्ते योजनेत बदल करीत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण रस्ते योजना असे नामकरण करण्यात आले. मात्र या योजना देखील इतर योजनांप्रमाणे कागदावरच राहिल्याने आजही पांदण आमदारांसमोर ग्रामीण रस्त्यांचे आव्हान उभे आहे.
नवनिर्वाचित आमदार समोर आव्हान..
ग्रामीण भागातील गावांना शहराला जोडणारे मुख्य रस्ते व शेतात जाणारे पांदण रस्ते दुरुस्तीचे आव्हान असून, ही समस्या सोडविण्यासाठी येणाऱ्या बजेट अधिवेशनात शासनाकडून निधी खेचून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहतील का..? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. जनता दरबारमध्ये सूचना देऊनही पादण रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही… ही दुर्दैवी बाब आहे. हदगांव तालुक्यातील पांदण रस्त्याबाबत स्थानिय प्रशासनाची उदासीनता असल्याने ग्रामीण भागातील पांदण रस्त्याचा जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न नवनिर्वाचित आमदार कश्या प्रकारे सोडवतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.