किनवट परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील मौजे धानोरा (शिख) येथील एक वृद्ध पाण्याचा अंदाज न आल्याने पैनगंगा नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
तालुक्यातील धानोरा (शिख) येथील माधवराव बापूराव अनंतवार (वय ८१ वर्षे) हे शनिवारी (दि.24) सकाळी नेहमीप्रमाणे प्रातर्विधी करीता गावालगतच्या पैनगंगेच्या पात्रात गेले होते. मात्र, ते नंतर परतच आले नाहीत. त्यामुळे गत दोन दिवसापासून त्यांचा शोध सुरू होता. याविषयी सिंदखेड पो.स्टे.ला फिर्यादही देण्यात आली होती.
बऱ्याच शोधानंतर नदीपात्रात बरेच पुढे त्याची काठी आढळून आली. त्यावरून पाय घसरून पडल्यामुळे पाण्याचा प्रवाहात ते वाहून गेल्याचा अंदाज ग्रामस्थांनी केला. त्यांचे शरीर दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी रामपूर- भामपूर शिवारात पैनगंगेच्या पात्रात मृत अवस्थेत आढळून आले. पुढे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडं असा परिवार आहे.