नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल 29 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलै व बारावीची पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे दिला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार 30 जुलै ते शुक्रवार 8 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.


या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून इ. 10 वी व 12 वी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करतांना ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.


जून-जुलै 2025 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.


जून-जुलै 2025 च्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेमध्ये सर्व विषयांसह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तरतुदींच्या अधीन राहून लगतच्या तीन संधी (फेब्रुवारी-मार्च 2026, जून-जुलै 2026 व फेब्रुवारी-मार्च 2027) उपलब्ध राहतील.

फेब्रुवारी-मार्च 2026 इ. 10 वी व 12 वी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा नियमित, पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य मंडळाचे सचिव यांनी दिली आहे.


