श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर। घरकुल लाभार्थ्याकडून मस्टर काढून देण्याच्या नावावर पैसे उकळणाऱ्या अभियंता व रोजगार सेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता रुई गावकऱ्यांनी ग्रामसभेत एकमताने ठराव घेतला आहे.


माहुर तालुक्यातील रूई येथील रोजगार सेवक अशोक मानतुटे हा गावातील घरकुल कामाचे मस्टर काढण्यासाठी पंचायत समितीचे घरकुल विभागाचे अभियंता श्रीराम यांना पैसे द्यावे लागतात त्याकरिता लाभर्थ्यांकडून पैशाची मागणी करीत असुन जे लाभार्थी पैसे देतील त्याचेच मस्टर काढण्यात येईल अशी तंबी घरकुल लाभार्थ्यांना देत असल्याने गरीब लाभार्थी आपले घरकुलाचे पैसे मिळावे याकरिता गपगुमान पैसे देत होते परंतु पैशाची वारंवार मागणी केल्या जात असल्याने याची तक्रार गावकऱ्यांनी सरपंच,सचिवांकडे करून कारवाईची मागणी केली.



याची शहानिशा केल्या नंतर हा प्रकार सर्रास सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सरपंच ,सचिव व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी दि.३० मे रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. यावेळी गावकऱ्यांनी रोजगार सेवक मानतुटे व अभियंता श्रीरामे यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचुन दाखविला अखेर गावकऱ्यांनी या रोजगार सेवक व अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता ग्रामसभेत ठराव मांडला व तो एकमताने मंजुर करण्यात आला.


घेण्यात आलेला ठराव कारवाईसाठी गटविकास अधिकारी पं.स.माहुर,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी नांदेड यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ.लता गणेश राऊत यांनी दिली. रुई गावकऱ्यांनी चक्क अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामसभेच्या ठरावा द्वारे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली असुन यावर प्रशासन कोणती करावी करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



