नांदेड| नांदेड ग्रामीण पोलिसांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मोठी कारवाई करत गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर छापा टाकला. या कारवाईत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून एकूण ₹42,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता मौजे विष्णुपुरी शिवारात पेट्रोलिंग करीत असतांना गोदावरी नदी पात्रात नांदेड ग्रामीण पोलिसांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक आणि नदीकाठावर साठवणूक करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी 10 ब्रास रेती (₹50,000), 3 तराफे (₹1,50,000) – एकूण ₹2,00,000 मुद्देमाल जप्त केला असून, एक आरोपी नदीत उडी मारून फरार झाला आहे.


त्याच दिवशी 12:05 वाजता हस्सापूर रोड, गोदावरी ब्रिजजवळ छापा टाकून पोलिसांनी MH26 BE 4303 हायवा ट्रक (₹40,00,000) व 5 ब्रास रेती (₹25,000) – एकूण ₹40,25,000 मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच रेती काढण्यासाठी वापरण्यात येणारी काही अवैध उपकरणे जागीच नष्ट करण्यात आली असून, चालक हिराचंद संभाजी भोकरे (रा. असर्जन) यास ताब्यात घेतले आहे. या दोन्ही घटनेत पोलिसांनी एकूण ₹42,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.


हि कार्यवाही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 48(7)(8), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 9,15, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 इ. अंतर्गत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल वेन यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व पथकाने केली. या धाडसी कारवाईबद्दल वरिष्ठांनी पथकाचे कौतुक केले आहे.



