माहूर/नांदेड| महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुकामातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने प्रारंभ झाला. सकाळी ७ वाजता मातृतिर्थ तलावातील पवित्र जल आणून देवीचा अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सकाळी ११.३० वाजता पारंपरिक विधीवत घटस्थापना संपन्न झाली.


घटस्थापनेच्या वेळी “उदे ग अंबे उदे” च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजाताई मुंडे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व महाआरती केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा संपन्न झाली.



देवीला पिवळ्या पैठणी वस्त्र अलंकार अर्पण करून साजशृंगार करण्यात आला. घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक काढून परिसरातील परिवार देवतांची पूजा, नैवेद्य व आरती तसेच कुमारिका पूजन करण्यात आले.



नवरात्र दरम्यान दररोज सप्तशती पाठ, शतचंडी ग्रंथ पठण, महापूजा, महाआरती व महाप्रसाद यांचे आयोजन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भाविकांसाठी छबिना मिरवणुकीनंतर दररोज प्रसादाची सोय ठेवण्यात आली आहे.


मंदिर फुलांनी सजविण्यात आले असून सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांतून हजारो भाविक माहूर गडावर दाखल झाले आहेत. दरम्यान दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसातही भाविकांची भक्तिभावाने रांग कायम असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

सुरक्षेची व्यापक व्यवस्था : – भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला, तहसीलदार अभिजीत जगताप, पोलीस निरीक्षक गणेश कराड, नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी, देवस्थान व्यवस्थापक योगेश साबळे आदींसह पोलीस व होमगार्ड कर्मचारी तैनात होते. सुरक्षा रक्षकांनी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घेतली. नवरात्र उत्सवाची सुरुवात भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात झाली असून प्रतिपदेपासून ते विजया दशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम मंदिर परिसरात सुरू राहणार आहेत.


