देगलूर l “पत्रकारांनी समाजाचे प्रबोधन केले पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लिहिले पाहिजे,” असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला होता. याच प्रेरणादायी विचारांना उजाळा देत पत्रकार संरक्षण समिती, देगलूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत आदरपूर्वक व उत्साहात साजरी करण्यात आली.


समाज परिवर्तनाचे महानायक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. पत्रकार संरक्षण समिती ही केवळ पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना नसून सामाजिक उत्तरदायित्वही तितक्याच निष्ठेने पार पाडणारी संस्था आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम होते. त्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुका संघटक गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, प्राचार्य गणेश जाधव, शेख अफान, इस्माईल खान आदी मान्यवर उपस्थित होते.


या प्रसंगी उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या कार्यात आचरणात आणण्याचा संकल्प केला. सामाजिक न्याय, बंधुता आणि समता या मूल्यांची जपणूक करत पत्रकार संरक्षण समिती पत्रकारांच्या हक्कासाठी आणि जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.



