नांदेड l महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशन ची नांदेड (हजुर साहिब) ते अमृतसर व्हाया नरसी नामदेव हि ११ वी “घुमान यात्रा” आज २७ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथून गंगानगर एक्सप्रेस ने पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे.


सर्व धर्म मानवतावादी असतात. ते समाजासमाजाला जोडण्याचे काम करतात. संत नामदेव यांनी मराठीची पताका थेट पंजाबपर्यंत नेली.त्यांच्या कार्याची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी नानकसाई फौंडेशन दरवर्षी “ना नफा ना तोटा” या पध्दतीने घुमानयात्रा आयोजित करते ही बाब ऐतिहासिक आहे. दहा दिवसांची घुमानयात्रा हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. आजवर या यात्रेत सुमारे ४ हजार जण सहभागी झालेले आहेत.


नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नियमितपणे ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते. आतापर्यंत दहा यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, यंदाची यात्रा अकरावी आहे.


🔹 प्रमुख वैशिष्ट्ये
संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे. सुवर्ण मंदिर, अमृतसर येथे दर्शन व वाघा बॉर्डरवर राष्ट्रभक्तीचा थरारक अनुभव. दिल्ली, चंदिगड, भटिंडा, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, जालियनवाला बाग या महत्त्वाच्या स्थळांना भेट. रामतीर्थ (लव–कुश जन्मस्थळ), वाल्मिकी आश्रम, भद्रकाली माता मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर, नैना देवी शक्तीपीठ, भाक्रा नांगल धरण, पानिपत, कुरुक्षेत्र आदी ठिकाणांचा यात्रेत समावेश आहे. पंजाबच्या पर्जिया कलान गावातील मुक्काम – तेथील संस्कृती व पाहुणचार जवळून अनुभवण्याची संधी यात्रेच्या माध्यमातून मिळणार आहे.श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाचा संगम हि घुमान यात्रेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

पंजाब चे मुखयमंत्री सरदार भगवंतसिंघ मान यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर मान यावर्षी घुमान यात्रे चे संगरुर रेल्वे स्टेशन वर स्वागत करणार आहेत. दरम्यान उद्या सोमवार दि.२७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता गंगानगर एक्सप्रेस ने यात्रा पंजाब हरियाणा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गोदावरी अर्बन आणि बुलढाणा अर्बन च्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नानक साई फाऊंडेशन चे उपाध्यक्ष सर्व श्री माधवराव पटणे, सुभाष बल्लेवार,जी नागय्या, प्रा उत्तमराव बोकारे, सतीश देशमुख तरोडेकर,तुलसीदास भुसेवार,सरदार राना रणबीरसिंघ पंजाब हॉटेलवाले,हरिदास भट्टड, विनायक पाथरकर, प्रा रामदास बोकारे, प्रा दत्तात्रय बोकारे,श्रेयस कुमार बोकारे, बळीराम पाटील पवार निवघेकर, जे एच पिनलवार, प्रकाश नागला, प्रल्हादराव भालेराव, गोविंद राऊत अतुल देवसरकर,अयुब पठाण यांनी केले आहे.


