हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील गटशिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान रॅलीचा फज्जा उडाला असून, शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना रॅली काढण्यासाठी बोलाऊन साधा खाऊ देखील वाटप करण्याची तसदी शिक्षण विभागाने घेतली नसल्याने पालक वर्गातून कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.



हिमायतनगर येथील शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील सर्व शासकीय निमशासकीय शाळांना शासन निर्णयाप्रमाणे हरघर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्याकरिता वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी सकाळी 9.00 वाजता हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंगल कार्यालयात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची सूचना ऐनवेळी देण्यात आली. तरीदेखील सूचनेचे पालन करून शहरातल्या अनेक शाळांच्या आपल्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थ्यांर्थीना घेऊन उपस्थिती दर्शविली होती. परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय नसल्याने अनेक विद्यार्थी सभागृहाबाहेर थांबून परत गेले तर सभागृहातील मंचावरून काय सूचना दिल्या जात होत्या हे समजत नसल्याने पाठीमागील अनेक विद्यार्थ्यांनी येथून काढत पाय घेतला असल्याचे चित्र प्रत्यक्ष दिसून आले आहे.



या तिरंगा रॅलेचे आयोजन करणारे शिक्षण विभागातील गटसमन्वयक व संबंधिताने या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध केली नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यावर चालविला जात असताना याकडे तालुक्याचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकप्रतिनिधीनी केवळ फोटो आणि बातमीपुरते काम न करता तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा वाढवून शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमाचे पालन होते की..? नाही याची खातरजमा करून शिक्षणप्रेमी जनतेसह पालकांना दिलासा देऊन आपल्या कर्तव्याप्रती आपण जागरूक असल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी केली जाते आहे.



सोमवारी शिक्षण विभागाने हिमायतनगर शहरात आयोजित केलेल्या हर घर तिरंगा अभियान कार्यक्रमासाठी कोणतेही पूर्व नियोजन केले नाही. खरे पाहता कार्यक्रम स्थळी हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृतीचे फलक, साउंड सिस्टीम व तसेच इतर कोणत्याही आवश्यक सुविधा केल्याचे दिसले नाही. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कसलेही नियोजन नसल्याचे पाहावयास मिळाले आहे. एकूणच तासभर विद्यार्थ्यांना सभागृहात बसवून गोंधळ होऊ लागल्याने रॅली तर काढलीच नाही. विद्यार्थी विद्यार्थिनींना खाउ देखील दिला गेला नाही. केवळ दिखाव्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय शाळांना निमंत्रण दिले व तासभर मंगल कार्यालयात बसवून ठेऊन घराकडे पाठविल्याचे चित्र दिसून आले आहे.


एकूणच आजच्या या प्रकारामुळे हिमायतनगर शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियान जनजागृतीचा फज्जा उडाल्याचे शिक्षणप्रेमी नागरीकातून बोलले जात आहे. या बाबीची शिक्षणविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन हिमायतनगर शिक्षण विभागात गेल्या अनेक वर्षपासून ठाण मांडून बसलेल्या गटसमन्वयकाची तात्काळ उचलबांगडी करावी आणि यापुढे शैक्षणीक उपक्रमाचे आयोजन करताना नियोजनबद्ध पद्दाथीने करून विद्यार्थी, पालक व शिक्षकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


