हिमायतनगर (अनिल मादसवार) सोमवारी रात्री विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शहर व परिसरातील नाले तुडुंब भरून वाहू लागले. शहरांलगत असलेल्या नडव्याच्या पुलावरून दुचाकीवरून जात असताना विदर्भातील एका मजुराला पुराच्या लाटांनी वाहून नेले. दैव बलवत्तर म्हणून त्याने झाडाचा आधार घेत कसाबसा जीव वाचविला, पुराच्या पाण्याने दुचाकी वाहून गेल्याने शोध घेतला असता दोन किलोमीटर दूरवर पाण्यात दुचाकी सापडली आहे.


रात्रभर त्याने झाडाचा आसरा घेऊन जीव वाचविला सकाळी पूर ओसरल्याने येथील गोदामाच्या बाजूने तो बाहेर पडला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडिताची विचारपूस केली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आरोप केला की, नडव्याच्या पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळेच अशा घटना घडत आहेत. थोडासा पाऊस झाला की येथे पाणी पुलावरून वाहून रस्ता बंद होतो. या मार्गावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच वरद विनायक भक्तांना सतत प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघाताचा धोका कायम राहतो आहे.



गावकरी व भाविकांचे म्हणणे आहे की, “युवकाचा जीव थोडक्यात वाचला असला तरी उद्या मोठी दुर्घटना घडू नये. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने नडव्याचा पूल उभारावा, जेणेकरून शेतकरी, विद्यार्थी व भाविक भक्त, प्रवासी सुरक्षितपणे प्रवास करू शकतील.”


सततच्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त – शेतकरी हवालदिल
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमिनी पाण्याखालीच आहेत. सोयाबीन पिके काळवंडून सडली असून, कापसाच्या रोपांची पाने गळून पडल्याने यंदा शेतकऱ्यांच्या हाती काहीही येणार नाही, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. हिमायतनगर शहर व तालुक्यात तिसऱ्यांदा सुमारे दोन तास चाललेल्या अतिवृहस्ती सदृश्य मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले. शेतांमधील बांध फुटल्याने खरीप हंगाम अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे हिमायतनगर तालुका आपत्तीग्रस्त घोषित करून नदी-नालेकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के तर इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

