आज ४ सप्टेंबर म्हणजेच आमच्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी खासदार, श्रद्धेय, आदरणीय डॉ. व्यंकटेशजी काब्दे सर यांचा वाढदिवस डॉ. व्यंकटेशजी काब्दे सरांचा जन्म दि. ४ सप्टेंबर १९४० रोजी देगलूर ह्या ठिकाणी अत्यंत साधारण कुटुंबात झाला. त्यांचे आई-वडील कपडे रंगवण्याचे काम करायचे आणि त्यातुन आपला उदरनिर्वाह चालवायचे अशा अत्यंत साधारण कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात जातो व डॉक्टर होऊन भारतात परत येऊन रुग्णांची सेवा करतो ही बाब आपल्या येथील शिकाऊ तरुणासाठी खुप प्रेरणादायक आहे असे मला वाटते.


काब्दे संराचे कार्य केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरतेच मर्यादीत नसुन त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ही उत्तम कामगीरी केली. मराठवाडा जनता विकास परिषद असो अथवा जनता दलासारख्या राजकीय पक्ष असो अश्या वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातुन त्यांनी खुप मोठी कार्य केली, आज ही करत आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यावर सार्वजनिक दृष्ट्या संसदेमध्ये महत्वाच्या विषयावर सरकारची धोरणात्मक बाजू समजून घेण्यासाठी त्यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले होते. यावरुन त्यांना अधिक काळ मिळाला असता तर सामान्य माणसांच्या प्रश्नाला ते अधिक न्याय देवू शकले असते. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातुन मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांवर बैठक घेऊन हा प्रश्न राष्ट्रपतीपर्यंत त्यांनी पोहचविला. वेगवेगळ्या अनाथ आश्रमामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अनांथाची सेवा करतात. अधंश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने अधंश्रध्दा निर्मुलनाचे कार्य करतात. ह्या वयातही त्यांचे सामाजिक कार्य त्यांनी थांबवले नाही आज ही गल्लोगल्ली जाऊन ते स्वच्छता अभियान राबवतात.


योगायोगाने माझा वाढदिवस हा सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ४ सप्टेंबर ह्या दिवशी आहे. ह्याचा मला खुप अभिमान आहे. कागदोपत्री जरी वेगळा असला तरी वास्तविक जन्मदिनांक हा ४ सप्टेंबरच हा आहे. आणि म्हणुन तोच दिवस आम्ही वाढदिवस म्हणुन साजरा करतो. माझे घर (माहेर) सरांच्या दवाखाण्याच्या परिसरामध्ये आहे. त्यामुळे सरांबद्दल ऐकण्याचा आणि त्यांना लहानपणीच एक दोन वेळेस भेटण्याचा योग मला आला. ३२ वर्षापूर्वी सरांनी आपली संस्था गोदावरी हार्ट फाऊंडेशन मार्फत कुंटुबनियोजनाचे अभियान चालवले होते. त्यावेळेस मी ९ वर्षाची होते. माझे आई वडील सौ. सुरेखा किशनराव कसबे हे वार्डातील प्रसिध्द व्यक्ति असल्याकारणामुळे आणि तिथे लोकांमध्ये त्यांचे नावलौकीक असल्याकारणामुळे व लोकांशी त्यांचा चांगला संपर्क असल्याकारणामुळे त्या वार्डाची संपुर्ण जबाबदारी ही माझ्या आईच्या खांद्यावर सरांनी सोपवली. माझ्या वडिलांचे मोठे किराणा दुकान होते आज ही आहे.


त्यामुळे दुकानावर येणाऱ्या सर्व महिलांना आईला कुटुंबनियोजना बद्दल माहिती सांगण्यास सहज सोपे होते म्हणून आईने ती जबाबदारी स्विकारली. त्यावेळेस काब्दे सरांचे सहकारी प्रा. डॉ. मनोहरे सर होते. मनोहरे सर ह्या प्रमुख महिलांची मिटींग काब्दे सरांच्या दवाखान्यामध्ये घ्यायचे त्यावेळेस सरांच्या दवाखान्यामध्ये माझ्या आई सोबत मला जाण्याचा योग एक ते दोन वेळेस आला. मी सर्वांमध्ये लहान असल्याकारणामुळे जे कुणी भेटेल ते माझा लाड करायचे डॉ. मनोहरे सर तर माझा खुप लाड करायचे एकदा असेच मिटींगदरम्यान डॉ. काब्दे सर तीथे आले आणि डॉ. मनोहरे सरांनी माझी ओळख काब्दे संराना करुन दिली. त्यावेळेस मनोहरे सर म्हणाले ही आम्रपाली किशनराव व सुरेखाबाई कसबे यांची मुलगी ही खुप हुशार आहे आणि पुढे चालुन काही तरी चांगले नक्की होऊन दाखवेल असा माझा विश्वास आहे. असे म्हणताच काब्दे सरांनी माझ्या डोक्यावर हाथ ठेवला व पाठीवरुन हाथ फिरवला आणि मला आशिर्वाद ही दिले. हा प्रसंग मला आज ही लक्षात आहे. ह्या प्रसंगावरुन इतक्या मोठ्या मानसाच्या हृदयामध्ये सर्वसाधारण लोकांविषयी असलेली आपुलकी मला जानवली.

मग त्यांच्याच संस्थेतील पीपल्स महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेतले आणि २००९ मध्ये माझी हिंदी विभाग (वरीष्ठ महाविद्यद्यालय) मध्ये तासिका तत्वावर नियुक्ती झाली. तत्कालीन पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. इंगोले सर होते आणि आदरणिय डॉ. व्यंकटेश काब्दे सर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते, स्व. आदरणिय सदाशिवराव पाटील सर हे उपाध्यक्ष होते तर सचिव आदरणिय प्रा. श्यामलताई पत्की मॅडम होत्या. यांच्याच कार्यकाळात म्हणजे २०१६ मध्ये पीपल्स महाविद्यालयाच्या कनिष्ठ
विभागात माझी हिंदी शिक्षिका म्हणून स्थायी स्वरुपात नियुक्ती झाली. आज मी जे काही आहे. त्यात माझ्या गुरुजनांसोबत वरील सर्व मंडळीचा खुप मोठा वाटा आहे. असे मला वाटते आणि त्याचा मला खुप अभिमान आहे.
डॉ. काब्दे सरांना वेगवेगळ्या कार्यक्रमातुन ऐकण्याचा योग आला आणि काही वेळा त्यांना भेटण्याचा पण योग आला. पहिली भेट म्हणजे आम्ही सर्वजन सरांना वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी गेलो आणि सरांना आम्ही शुभेच्छा दिल्या. माझ्या सहकाऱ्यांनी सरांना सांगितले की, आज कसबे मॅडमचाही वाढदिवस आहे. हे कळल्यावर सर अत्यंत खुश झाले. मी सरांचे आशिर्वाद घेतले तेव्हा सरांनी माझ्यासाठी मॅडमला सांगुण एक शॉल मागवुन घेतली आणि ती शॉल आणि त्यांचे कवितेच पुस्तक मला माझ्या वाढदिवशी भेट दिली ती शॉल व पुस्तक आजही माझ्याकडे जपुन ठेवलेले आहे. मग तीथे जमलेल्या सर्वांसाठी त्यांनी चहा फराळाची व्यवस्था केली आणि तेथील व्यक्तीला सर्वांना फराळ देण्यासाठी सांगितले व ट्रेमधील फराळाची प्लेट स्वतः उचलुन त्यांनी मला दिली आणि म्हणाले की, आज मॅडमचा वाढदिवस आहे म्हणून मी स्वतः त्यांना फराळ देतो असे म्हणाले हे बघीतल्यावर मला खुप आनंद झाला आणि खुप अभिमानही वाटला असे वाटले की ऐवढा मोठा मानुस जो सर्व राज्यामध्ये आपल्या कार्य व कतृत्त्वासाठी प्रसिध्द आहे तो आपल्यासाठी फराळाची प्लेट आनुण देतो ही गोष्ट काही छोटी गोष्ट नव्हती म्हणून जेव्हा जेव्हा काब्दे सरांना बघते आणि भेटते तेंव्हा तेव्हा वरील सर्व प्रसंग मला आठवतात आणि त्यांच्या बद्दलचा आदर अजुनच द्विगुणीत होत जातो.
सरांसोबत पुढची भेट ही तेव्हा झाली जेंव्हा माझी तब्बेत बिघडली आणि डॉक्टरांनी बऱ्याच टेस्ट सांगितल्या त्या टेस्ट सरांच्या दवाख्याण्यात उपलब्ध होत्या तेव्हा मी सरांना भेटले आणि माझ्या आजारा बद्दल सांगितले व माझे रिपोर्ट सरांना दाखवले तर सरांनी मला धीर दिला व त्यांच्याच घरच्या काही मंडळीचे उदाहरण देऊन सांगितले की, ह्या सर्वांना असाच आजार होता पण आज खुप वर्ष झाली ते त्या आजारातुन मुक्त झालेत. तुम्ही ही त्यातुन बरे व्हाल काही चिंता करु नका. फक्त लवकर ट्रिटमेंट सुरु करा असे त्यांनी सांगितले. तेव्हा मलाही खुप बळ आले आणि मी माझ्या आजाराची ट्रिटमेंट सुरु केली. वरील व ह्या सर्व प्रसंगावरुन एका हद्द्याचे विकार ओळखणाऱ्या अस्सल हदयाच्या मानसाचे रुप मला काब्दे सरांमध्ये वेळोवेळी दिसते. काब्दे सरांबद्दल लिहित असतांना हिंदी च्या काही ओळी इथे आठवतात
“अच्छे इंसान की सबसे पहिली और सबसे आखिरी निशानी ये है कि, वो उन लोगों की भी इज्जत करता है, जिनसे उसे किसी किस्म के फायदे की उम्मीद नहीं होती ।” असे आपले काब्दे सर जे कोणताही फायदा नसतांना माझ्या सारख्या सर्वसामान्य व्यक्तिला ही आदर व सम्मान देणारे तर ह्या महान व्यक्तिमत्वाला त्यांच्या ८५ व्या वाढदिसानिमित्त खुप खुप शुभेच्छा देते. त्यांचे येणारे जीवन सुखी, समृध्द आणि आरोग्याने भरलेले असो ही सदिच्छा व्यक्त करते व थांबते.
धन्यवाद !
लेखिका.. प्रा. डॉ. आम्रपाली किशनराव कसबे, पीपल्स महाविद्यालय, नांदेड


